‘त्या’ ट्रॅक्टरमध्ये वाळू नव्हे तर होती माती
रावेर : रावेर महसूल पथकाने अवैध वाळूचे ट्रॅक्टर-ट्रॉली 10 रोजी जप्त केली होते व तहसील कार्यालयात नेऊन दंड न करता सोडून दिल्याप्रकरणी महसूल प्रशासनाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. या प्रकरणी प्रांताधिकार्यांनी संबंधिताना खुलासे सादर करण्याचे आदेश दिले होते. संबंधितानी याबाबत खुलासा सादर केला असून या खुलाशात त्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये वाळू नव्हे तर माती असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अद्याप चौकशी सुरू : प्रांताधिकारी
रावेर महसूलच्या पथकाने अवैध वाळूचे ट्रॅक्टर-ट्रॉली 10 रोजी शहरातील आठवडे बाजाराजनजीक पडकत ते वाहन तहसील कार्यालयात आणले मात्र काहीच वेळात ते सोडून देण्यात आले होते. या प्रकरणी प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी रावेरच्या त्या महसूल पथकाला लेखी खुलासे सादर करण्याचे बजावले होते. महसूल पथकाने लेखी खुलासे सादर केले असून त्यात वाळू नव्हे तर माती असल्याचे खुलाशात नमूद आहे. या प्रकरणी पथकाला कडक शब्दात समज देण्यात आले असून अद्यापचौकशी सुरू असल्याचे प्रांतधिकारी कैलास कडलग म्हणाले.

10 रोजीच्या माती परवान्याची चौकशी करा
गौण खनिजाची वाहतूक करताना संबधित ट्रॅक्टर चालकाकडे परवाना असतो मात्र 10 रोजी पकडलेले ट्रॅक्टरमध्ये जर माती होती तर ते तहसील कार्यालयात जप्त करून का नेण्यात आले? 10 फेब्रुवारी रोजी किती माती वाहतुकीचे परवाने देण्यात आले? याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
