वादळी वार्‍याने घराचे नुकसान : आमदारांनी केली पाहणी


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी व परीसरात नुकत्याच आलेल्या वादळाने कोथळीच्या महादेव भास्कर पाटील या मजुरी काम करणार्‍या व्यक्तीच्या घराची पडझड झाली तर अंगणातील गाय आणि म्हशीच्या अंगावर भिंत कोसळल्याने तेदेखील किरकोळ जखमी झाले होते. याप्रकरणी सरपंच व उपसरपंच यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पडझड झालेल्या घराची पाहणी केली. तलाठी महादेव दाणे यांना तत्काळ पंचनामा करून शासनाकडे अहवाल पाठविण्याच्या सूचना केल्या तसेच नुकसान झालेल्या कुटुंबियांना धीर देत पदरमोड करून रोख 10 हजारांची मदत केली.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी सरपंच नारायण चौधरी, उपसरपंच पंकज राणे, ग्रामसेवक रोकडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश राणे, सुभाष पाटील, बाळा विटकरे, मोहब कोळी, मुक्ताईनगर शहर प्रमुख राजेंद्र हिवराळे, दीपक पवार, स्वीय सहायक प्रशांत पाटील यांच्यासह गावकर्‍यांची उपस्थिती होती.


अंगणातील गाय व म्हैस किरकोळ जखमी
महादेव पाटील व कुटुंबीय घरात झोपलेले असतांना अचानक सुटलेल्या वादळी वार्‍याने घराला जोरदार तडाखा बसला यात सुदैवाने भिंत बाहेरील बाजूस कोसळली यामुळे महादेव पाटील हे कुटुंबासाहित बालंबाल बचावले परंतु बाहेरील बाजूस गाय व म्हैस अंगणात झोपलेले असतानाच त्यांच्या अंगावरच भिंत कोसळली. ज्यात दोघे पशुधन जखमी झाले. या पशूधनावर गावातील पशूवैद्यकीय डॉ.जवरे यांनी प्रथमोपचार केले. पाटील यांच्या घराशेजारी नारखेडे यांच्या ही घराची किरकोळ पडझड झाली. या कुटुंबियांची देखील आस्थेवाईकपणे विचारपूस करण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !