साकळीत लसीकरणापूर्वी कोरोना चाचणीची सक्ती
30 लाभार्थींनी नकार दिल्याने राहिले वंचित
यावल : यावल तालुक्यातील साकळीसह काही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी आलेल्या रुग्णांना रॅपीड अॅन्टीजन चाचणीसाठी सक्ती केली जात आहे, यामुळे प्राथमिक केंद्रातून बुधवारी किमान 25 ते 30 लाभार्थी माघारी गेले. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक एन. एस. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता मात्र लसीकरणापूर्वी कोरोना चाचणीचे कोणतेही बंधन किंवा सक्ती नसल्याचे सांगितले. यानंतरही साकळी केंद्रात मात्र सक्तीने चाचणी केली जात आहे.
लसीकरणाविनाच परतले नागरीक
साकळी, ता.यावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना लसीकरणासाठी गेलेल्या रुग्णांना वैद्यकिय अधिकारी व कर्मचार्यांनी प्रथम रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करावी लागेल, यानंतरच लसीकरण केले जाइल, असे सांगितले गेले. बर्याच रुग्णांचा रॅपीड अॅन्टीजन टेस्टवर फारसा विश्वास नसल्याने त्यांनी चाचणी केली नाही. लसीकरणासाठी आलेल्या रुग्णांना कोणत्याही प्रकारचे लक्षणे नसल्याने त्यांनी चाचणीस नकार दिला, यामुळे त्यांना लसीकरणाविना परतावे लागले. याबाबत रुग्णांनी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.हेमंत बर्हाटेंकडेही तक्रार केली, मात्र त्यांनीही हा नियमच असल्याचे सांगितले. दरम्यान यावल तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या चाचण्या कमी होत आहेत. चाचणींचे प्रमाण वाढविण्यासाठी लसीकरणासाठी आलेल्यांचीची चाचणी करण्याचा नवीन फंडा वापरला जात आहे. तर दुसरीकडे मात्र संशयीत रुग्ण चाचणीविनाच फिरत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाही तर लसीकरणासाठी आलेल्यांना चाचणीची सक्ती केली जात असल्याने आगामी काळात भितीपोटी लसीकरणही थांबण्याची भिती आहे. प्राथमिक आरेाग्य केंद्रातील काही कंत्राटी वैद्यकिय अधिकार्यांमुळे साकळी परीसरातील लसीकरण मोहिम थांबू शकते. यामुळे या प्रकरणी वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

वरीष्ठांचे मार्गदर्शन घेवू
लसीकरणासाठी आलेल्यांची कोरोना चाचणी करण्याच्या आम्हाला लेखी सूचना नसल्या तरी व्हीडीओ कॉन्फरन्समध्ये सांगितले आहे. यानुसार हा नियम पाळला जात आहे. परीरष्ठांचे मार्गदर्शन घेवून निर्णय घेवू, असे यावलचे तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत बर्हाटे म्हणाले.
असा नियमच नाही
लसीकरणासाठी आलेल्यांची कोरोना चाचणी करण्याचा कोणताही नियम नाही. असा नियम कोठे लादला जात असले तर चुकीचे आहे. याबाबत व्हीसीमधून सर्व वैद्यकिय अधिकार्यांना सूचना दिल्या जातील, असे जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक एन.एस.चव्हाण म्हणाले.
