तापी पात्रात बुडाल्याने तरुण मेंढपाळाचा मृत्यू
यावल : तालुक्यातील पिळोदा गावाजवळील तापी नदीपात्रात बुडाल्याने भगवान घमा सरगर (20, रा.बाघापूर, ता.साक्री, ह.मु.गिरडगाव) या तरुण मेंढपाळ तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. गिरडगाव येथे काही मेंढपाळ कुटुंबे गेल्या चार महिन्यांपासून मेंढ्या चारण्यासाठी आले आहे. त्यातील भगवान घमा सरगर हा तरुण आपल्या चुलत भावासह बुधवारी पिळोदा भागात मेंढ्या चराईसाठी आला होता. दुपारी मेंढ्या तापी नदीत पाणी पिण्यासाठी गेल्या. यात काही मेंढ्या तापी नदीच्या खोल पाण्यात गेल्याने त्यांना आणण्यासाठी भगवान हा नदीच्या मध्यभागी खोल पाण्यात गेला. त्यास खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्यास वाचवण्यासाठी सोबत असलेल्यांनी आरडाओरड केली. तोपर्यंत तो पाण्यात बुडाला. यानंतर पिळोद्यातील ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढून यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यास मदत केली. तेथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. या प्रकरणी मोहन सरगर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार गोरख पाटील करीत आहे.

