लढ्याला यश : राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांची वेतनाची प्रतीक्षा संपली
शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाला यश : विनाअनुदानीत शिक्षकांमधून समाधान
भुसावळ : गेल्या 45 दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विनाअनुदानित तत्त्वावर काम करणारे विनाअनुदानित शिक्षकांनी आपल्या कुटुंबासह आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला यश आले असून राज्यांमध्ये विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचा निर्णय टप्प्याटप्प्याने घेण्यात आला मात्र यामध्ये 2014 या वर्षी उच्च माध्यमिक शाळांना अनुदान देण्यासाठी त्यांचे मूल्यांकन करून निधी वितरण करण्याचे ठरविण्यात आले होते परंतु सातत्याने या शाळांच्या विविध स्तरावर सारख्या तपासण्या करूनही शिक्षकांना हक्काच्या वेतनापासून वंचित रहावे लागत होते. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात देखील हा प्रश्न गाजला व अधिवेशन संपल्यानंतर देखील आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी शालेय शिक्षण विभाग व वित्त विभागाचे अधिकारी यांच्याशी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर 20 टक्के व 20 टक्के घेत असलेल्या शाळांना पुढील 40 टक्के टप्प्यांचा निधी वितरणाचा शासन निर्णय पारीत झाल्याने खर्या अर्थाने 20 वर्षांच्या लढ्याला यश आले आहे.
आंदोलनाला आले यश
महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अघोषित, घोषित अंशतः अनुदानीत शाळांचा प्रश्न मिटावा यासाठी आजाद मैदान, मुंबई येथे अघोषित शाळा घोषित व्हाव्यात, 20 टक्के 40 टक्के अनुदान मंजूर होऊन निधी वितरणाचा जीआर पारीत करावा, प्रचलित अनुदानाचे सुत्र आणावे, इतर मागण्यांसाठी आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन सुरू होते.आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच आमदार डॉ.सुधीर तांबे, सरचिटणीस प्रा.प्रकाशजी सोनवणे हे मंत्रालयामध्ये ठाण मांडून होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना सातत्याने भेटून प्रश्न सोडवण्यासाठी आग्रह धरला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आली परंतु निधी वितरणाचा शासन निर्णय काढण्यात आला नव्हता मात्र तो आता निघाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

यांचाही लढा मोलाचा
न्याय मागण्या मान्य करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून प्रा.के.पी.पाटील, राज्याध्यक्ष प्रा.दीपक कुलकर्णी, प्रा.संतोष वाघ, राहुल कांबळे, कर्तार ठाकूर, अनिल परदेशी, राज्य सचिव, प्रा.सुधीर चौधरी, डी.आर.पाटील, नाशिक विभाग अध्यक्ष गुलाब साळुंखे, एन.डी.पाटील, पराग पाटील, राजेंद्र साळुंखे, पी.एन.तायडे, महेंद्र बच्छाव, वर्षा कुलथे आदी पदाधिकार्यांनी यशस्वी लढा दिला. जळगाव जिल्ह्यातील वरीष्ठ शिक्षक प्राध्यापक सुनील गरुड, प्रा.शैलेश राणे यांचेदेखील या विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नांच्या बाबतीत सातत्याचा पाठपुरावा सुरू होता. विनानुदानित शिक्षकांना मार्गदर्शन प्रा.सुनील गरुड व शैलेश राणे यांचे सहकार्य लाभले.
संपूर्ण प्रश्न धसास लावणार
आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी सांगितले की, आपले काम अजून पूर्ण झालेले नाही अजून अघोषित शाळांचा प्रश्न आहे तसेच पायाभूत वाढीव पदांचा प्रश्न आहे त्यासाठीदेखील पाठपुरावा सुरू आहे. जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपला पाठपुरावा सातत्याने सुरू राहील, असा विश्वासही आमदार तांबे यांनी व्यक्त केला.
शासनाचे आभार : प्रा.अनिल परदेशी
महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेचे राज्य सचिव प्रा.अनिल परदेशी म्हणाले की, बुधवार, 17 मार्च 2021 रोजी राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांसाठी निधी वितरणाचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. शासनाचे त्याबद्दल आम्ही आभारी असून प्रश्न अजूनही पूर्णतपणे संपलेला नाही. शासनाने 20 वर्ष विनावेतन काम करणार्या शिक्षकांना प्रचलित सूत्रानुसार लवकर पुढील टप्पे द्यावे ही मागणी असल्याचेही प्रा.परदेशी यांनी सांगितले.
