मतदारसंघात अल्पसंख्यांक समाजाला नेहमीच सत्तेत वाटा दिला


माजी मंत्री एकनाथराव खडसे : मुक्ताईनगरात मेळावा

मुक्ताईनगर- निवडणूक जवळ आली की पावसाळ्यातील बेडकांप्रमाणे काही लोक उगवतील, अपप्रचार करतील सोबत असल्याचा पुळका आणतील परंतु आपण सजग रहायला हवे, आपापसात भांडणे लावणार्‍या या व्यक्ती पासून सावध रहायला हवे. गेधया 30 वर्षांपासून मी आपले नेतृत्व करत आहे परंतु कधी जातीत भांडणे लावले नाही, मतदारसंघात शांतता भाईचारा टिकवून ठेवला, मतदारसंघाचा विकास केला समाजातील, शेवटच्या घटका पर्यंत विकास नेला त्यात कधी जाती-पातीचा भेदभाव केला नाही, अल्पसंख्यांक समाज हा नेहमी माझ्यासोबत असून यापुढेदेखील राहणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा क्षेत्रातील अल्पसंख्यांक बांधवांचा मेळावा अल फलाह हायस्कूलमध्ये झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

भूलथापांना बळी न पडता सहकार्य करा -खडसे
खडसे म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजाला नेहमी मी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. सत्तेत प्रतिनिधीत्व दिले, मुक्ताईनगर, बोदवड येथे प्रथम नगराध्यक्ष अल्पसंख्यांक समुदायातील केला. अल्पसंख्यांक मंत्री असताना उर्दू भाषेचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी राज्यात मालेगाव, भिवंडी अशा पाच ठिकाणी उर्दू हाऊसची निर्मिती केली. मतदारसंघात अल्पसंख्याक समाज असून त्या प्रत्येक गावात कब्रस्तानसाठी निधी, शादीखानासाठी निधी दिला, अल्पसंख्याक समाजातील मुलांनी फक्त गवंडी काम न करता शिक्षण घेऊन कुशल तंत्रज्ञ व्हावे यासाठी मुक्ताईनगर येथे अल्पसंख्याक तंत्रनिकेतनची निर्मिती केली, असेही ते म्हणाले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, माजी अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान, जेडीसीसी बँक अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, मुक्ताईनगर नगराध्यक्षा नजमा तडवी, बोदवड नगराध्यक्षा मुमताज बी.बागवान, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाणे, उपनगराध्यक्ष मनीषा पाटील, अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष शकील, सावदा येथील असगरभाई, कालू मिस्त्री, ताहेर खान पठाण, नगरसेवक शकील बापू ससाणे, निलेश शिरसाट, मस्तान कुरेशी, आमीन खान, आरीरफ आजाद, उसमा रउफ खान मान्यवर उपस्थित होते.

समाजाचा विकास हाच ध्यास
अशोक कांडेलकर यांनी भाजपा सरकारने अल्पसंख्यांक समाजासाठी आणलेल्या योजनांची माहिती दिली. अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांनी नाथाभाऊ हे गेल्या तीस वर्षांपासून अल्पसंख्याक समाजाला सोबत घेऊन चालत असल्याचे सांगितले. खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत तुम्ही अपप्रचारला बळी न पडता मला मतदान केले त्याबद्दल मी आपली आभारी आहे. काही नतदृष्ट प्रवृत्तीचे लोक भाजपा, आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे अल्पसंख्याक समाजाच्या विरोधी आहेत, अशी गरळ ओकतात मात्र समाजाच्या विकासासाठी केंद्र राज्य सरकारने विविध योजना आणल्याचे त्या म्हणाल्या.


कॉपी करू नका.