मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहतांना चंद्रकांत दादांनी माझी अवस्था पहायला हवी होती

भुसावळात माजी मंत्री एकनाथराव खडसे ; भाजपामधील इनकमिंगवर गडकरींच्या मताशी दर्शवली सहमती
भुसावळ- मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहिल्याने माझी झालेल्या अवस्था उभ्या राज्यानेही पाहिली त्यामुळे महसूलमंत्री चंद्रकांत दादांनी माझ्या अवस्था पहायला हवी होती, असा टोला राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे मारत भाजपामध्ये वाढत असलेल्या इनकमिंगच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘उंदराप्रमाणे पक्षातून ईकडून तिकडे उड्या मारणार्यांसाठी कायदा करायलाच हवा’ वक्तव्याशी आपण सहमत असल्याचे त्यांनी सांगत खळबळ उडवून दिली. महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर डी.एस.हायस्कूलच्या मैदानावर मंगळवारी झालेल्या पत्रकार परीषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री माझे चांगले मित्र, मिडीयाने वाढवले प्रकरण
माझे व मुख्यमंत्र्यांमध्ये कुठलेही वाद नाहीत, मतभेद असू शकतात मात्र मिडीयाने या प्रकरणाला अधिक हवा दिल्याचेही खडसे म्हणाले. मुख्यमंत्री खूप चांगले असल्याची स्तुतीही त्यांनी करीत आगामी सरकार भाजपाचेच येणार असून मुख्यमंत्रीदेखील भाजपाचा होणार असल्याचा टोला शिवसेनेचे नाव न घेतला हाणला. भाजपामध्ये होत असलेल्या इनकमिंगमुळे निष्ठावंतांवर अन्याय होत असून आरोप असलेल्यांना भाजपात प्रवेश दिला जात असल्याने आपण याबाबत मत व्यक्त करणार नाही मात्र केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या विधानाशी आपण सहमत असल्याचे ते म्हणाले. जे बोलायचे ते रोखठोक बोलायचे, कुणाला घाबरायचे नाही त्यामुळे विधानसभेतही आपण परखडपणे मत मांडले व जनतेनेही ते पाहिल्याचे ते म्हणाले.
