जन्मदात्याचाच दगडाने ठेचून केला खून
आरोपी मुलास अटक : रूमालपाडा येथील घटना
शिरपूर : तालुक्यातील हाडाखेड अंतर्गत रुमालपाडा येथे किरकोळ कारणावरून आईला मारहाण करणार्या बापाचा रात्री मुलाकडून दगडाने ठेचून खून केल्याची घटना शुक्रवार, 19 मार्च रोजी सकाळी उघडकीस आल्यानंतर परीरसरात खळबळ उडाली आहे. हमर्या दसर्या पावरा (रा.रुमालपाडा हाडाखेड) असे खून झालेल्या पित्याचे नाव असून या प्रकरणी खून करणारा मुलगा दादुराम हमर्या पावरा यास अटक करण्यात आली.
भांडणानंतर पित्याचा केला खून
खुनाची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पीएसआय नरेंद्र खैरनार, हवालदार शेख, गोविंद कोळी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळी डॉग पथक व फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले.
रात्रीच्या सुमारास आईला दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून मारहाण करीत असल्याचा कारणावरून बाप-लेकात भांडण झाले. या भांडणातून आई व पत्नी घाबरून एका शेतात रात्र घालवण्यानंतर सकाळी झोपडी जवळ आल्या असता पती हमर्या दसर्या पावरा हा मयत स्थितीत आढळून आला तर मुलगा दादुराम हमर्या पावरा हा बाजूला झाडाखाली बसलेला दिसून आल्याने त्यास काय झाले असल्याचे विचारले असता त्याने बापाला दगडाने ठेचून मारले असल्याचे सांगितले. या प्रकरणी मयताची पत्नी सरादीबाई हम-या पावरा (54) यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून मुलगा दादुराम हमर्या पावरा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.


