सोशल मीडियामध्ये गुरफटलेली तरुणाई सोशल टचपासून लांबच


आमदार संजय सावकारे : भुसावळात जागर प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव

भुसावळ- सर्व जबाबदार्‍या शासनावर ढकलून नागरीक मोकळे होतात मात्र सेवक वृत्ती आणि देशाप्रती असलेली समर्पित भावना असेल तर स्वप्नवत भारत साकारण्यास वेळ नाही. जवाबदारीचा स्वीकार केल्याने सकारात्मक विचारांची सुरुवात स्वतःपासून होते मात्र आजकालची तरुणाई विघातक मार्गाकडे अधिक वळत आहे. सोशल मीडियामध्ये गुरफटलेली तरुणाई मात्र सोशल टचपासून पर लांब असल्याचे आमदार संजय सावकारे म्हणाले. जागर प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच जलदुत जागर सोहळा व भव्य पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन ब्राम्हण संघात झाले. याप्रसंगी आमदार बोलत होते.

तर समाजामध्ये सृजनशीलता -आमदार
आमदार म्हणाले की, आपल्यात सामावलेल्या शक्तीला विधायक वळण दिल्यास समाजामध्ये सृजनशीलता निर्माण होईल. जागर प्रतिष्ठान वस्त्रदान, पुस्तक प्रदर्शन, मोबाईल ऑफ डे, जल जागर, स्वच्छता अभियान, निबंध लेखन यासारखे अनेक सेवाभावी जिल्हाभरात राबवीत आहे. यानिमित्ताने तरुणांमध्ये एक विधायक शक्ती निर्माण होत आहे. या शक्तीमुळेच सामाजिक एकोपा वृद्धींगत होत असल्याचे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी केले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
जागर सोहळ्याचे प्रास्ताविक अध्यक्ष प्रा.पंकज पाटील यांनी केले. प्रसंगी व्यासपीठावर समारंभाध्यक्ष आ संजय सावकारे, वक्त्या कविता पवार, नगरसेवक निर्मल कोठारी, अ‍ॅड.तुषार पाटील, अ‍ॅड.बोधराज चौधरी, अजब पब्लिकेशनचे मनोज साळुंखे, भारत विकास परीषदेच्या अध्यक्षा डॉ नीलिमा नेहेते, आदर्श सरपंच प्रा.मनीषा देशमुख, नरेंद्र पाटील उपस्थित होते.

जलदूत जागर पुरस्काराने गौरव
भुसावळ शहरातील सामाजिक संस्थांनी व व्यक्तींनी जल पुनर्भरण प्रकल्प राबवले. त्या व्यक्तींच्या सन्मानार्थ हा सोहळा आयोजित करण्यात आला.होता. यात संस्कृती फाऊंडेशनने ग्रामीण भागात बांधबंदिस्ती करून जलपुनर्भरण कार्यात आपले आमुलाग्र योगदान देत जमिनीच्या भूगर्भात पाणी जिरविले. व अनेक पर्यावरण पूरक कार्यक्रम राबवल्याचे विचारात घेत जागर प्रतिष्ठानच्या वतीने संस्कृती फाऊंडेशनला जलदूत जागर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले तसेच भुसावळ नगरपालिकेचे नगरसेवक अ‍ॅड.बोधराज चौधरी यांनी स्वखर्चातून आपल्या वॉर्डामध्ये चाळीस हजार रुपये खर्च करून बोरींग केली. व सर्व परीसरातील पाणी भूगर्भात जिरवले त्याबद्दल अ‍ॅड.बोधराज चौधरी यांना जलदुत जागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर जळगाव येथे प्रवीण दीप फाऊंडेशनने जल पुनर्भरण उपक्रम राबवून बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल जलदुत जागर पुरस्काराने गौरविण्यात आले.

वाचनाने माणसाचे मस्तक घडते -उद्योजिका कविता पवार
उद्योजिका कविता पवार म्हणाल्या की, वाचनाने माणसाला वैचारीक श्रीमंती लाभते. वाचन व्यक्तींच्या जीवनाला आकार देत असते, मुखात मधुर वाणी देत असते, वर्तनात सभ्यता प्रदान करीत असते तसेच वाचनाने माणसाचे मस्तक घडते. पुराण काळापासून ते आजतागायात वाचनाने महापुरुष घडविल्याचे अनेक दाखलेदेखील कविता पवार यांनी आपल्या व्याख्यानातून दिले. सूत्रसंचालन जागर मित्र शैलेश महाजन व संजय भटकर यांनी तर आभार अ‍ॅड.हरेशकुमार पाटील यांनी केले. यशस्वितेसाठी जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.पंकज पाटील, उपाध्यक्ष श्रीराम सपकाळे, कोषाध्यक्ष हृषिकेश पवार, कायदेतज्ज्ञ अ‍ॅड.हरेश पाटील, गोकुळ सोनवणे, प्रा.श्रीकांत जोशी, डी.एम.घुले, निलेश गोरे यांनी परीश्रम घेतले.


कॉपी करू नका.