भुसावळातील अयान कॉलनीत घरफोडी : लाखोंचा ऐवज लंपास
घर बंद असल्याची चोरट्यांनी साधली संधी : 20 तोळे सोन्यासह 50 तोळे चांदी व 30 हजारांची रोकड लंपास
भुसावळ : शहरातील अयान कॉलनीत घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने या परीसरात खळबळ उडाली. घरफोडीची माहिती कळताच बाजारपेठ पोलिसांसह श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानाने घरापासून काही अंतरापर्यंत माग दाखवल्याने चोरटे वाहनाने पसार झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, तक्रारदार बाहेरगावी असल्याने ते आल्यानंतर गुन्हा दाखल होईल, असे सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक म्हणाले.
बंद घराला केले टार्गेट
शहरातील अयान कॉलनीत सेवानिवृत्त लोकोपायलट असदअली खान हे कुटुबांसह राहतात. कामानिमित्त खान कुटुंब 16 रोजी प्रतापगढ येथे गेल्याने घर बंद असल्याची संधी 16 ते 20 मार्चदरम्यान चोरट्यांनी साधली. दर्शनी भागाचा दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील 30 हजारांची रोकड, 20 तोळे सोने व 50 तोळे चांदी लांबवल्याचे सांगण्यात येत असलेतरी तक्रारदार प्रत्यक्ष भुसावळात आल्यानंतर याबाबत ठोस काही सांगता येईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

श्वान पथकासह ठसे तज्ज्ञ दाखल
घरफोडीची माहिती कळताच पाचोरा पोलिस उपअधीक्षक भरत काकडे, सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, सहा.निरीक्षक गणेश धूमाळ, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, सहा.निरीक्षक योगेश महाजन, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, ईश्वर भालेराव व बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दुपारी जळगाव येथून श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानाने घटनास्थळापासून मुख्य रस्त्यापर्यंत माग दाखवल्यानंतर श्वान घुटमळले.
