केंद्रासह राज्याच्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पथनाट्याचा आधार
यावल आदिवासी एकात्मीक प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम
यावल- जिल्हा आदिवासी एकात्मीक विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकासाच्या विधायक योजनांची माहिती समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने पथनाट्याव्दारे जनजागृती अभियान राबवण्यात आले.
पथनाट्याद्वारे जनजागृती
यावल येथील आदिवासी एकात्मीक प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून जागतीक आदिवासी दिनापासुन जिल्हाधिकारी डॉ.आविनाश ढाकणे, नामदार हरीभाऊ जावळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, जिल्हा आदिवासी प्रकल्पस्तरीय नियोजन समितीच्या अध्यक्षा मीना राजु तडवी व जिल्हा प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शासकीय विविध विधायक योजनांची माहिती सातपुडा पर्वताच्या कुशीत अतिदुर्गम भागातील छोट्या-छोट्या गावासह पाड्यांवर राहणार्या शेवटच्या घटकापर्यंत पहोचवण्यासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता. गेल्या एक महिन्यांपेक्षा अधिक काळापासुन सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेली चोपडा, यावल, रावेर या तिघा शंभर टक्के आदिवासी तालुक्यातील 60 गावांमध्ये पथनाट्याद्वारा आदिवासी जनजागृती अभियान राबविण्यात आले.
अभियानाचा समारोप
आदिवासी समाज बांधवांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती देण्याकरीता जळगाव येथील दिशा संस्थेच्या वतीने पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. पथनाटय सादरीकरणात विनोद ढगे, सचिन महाजन, रोशन गांधी, दुर्गेश अंबेकर, देवराज बोरसे, महेश पाटील या कलावंतानी आपला उत्कृष्ठअसा सहभाग नोंदविला. तहसील कार्यालयाच्या आवारात तहसीलदार जितेंद्र कुवर , भाजपाचे यावल तालुकाध्यक्ष डॉ.नरेंद्र वामन कोल्हे व आदिवासी विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी जावेद तडवी, कार्यालय अधीक्षक आर.बी. अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या आदिवासी जनजागृती पथनाटय अभियानाचा समारोप करण्यात आला.