शहिद भगतसिंगांचे बलिदान पिढ्यान पिढ्या देशभक्तीची प्रेरणा देत राहील : निलेश रायपुरे
भुसावळ : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील भारत मातेच्या लेकरांचे बलिदान आम्हा भारतीयांची गौरवगाथा आहे. या गाथेतील सुवर्णपान म्हणजे शहीद भगतसिंग यांचे जीवन व कार्य होय. भारत मातेच्या मुक्तीसाठी त्यांचे बलिदान आम्हा भारतीयांना देशभक्तीची पिढ्यान पिढ्या प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन शहीद भगतसिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश रायपुरे यांनी केले.ते भगतसिंग यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.जतीन मेढे, सरजू तायडे, संघरत्न सपकाळे आदी उपस्थित होते.
देशभक्तीच्या कार्याची गावागावात पारायणे व्हायला हवीत
या प्रसंगी बोलतांना रायपुरे म्हणाले की, आम्हा भारतीयांना जे स्वातंत्र्य मिळाले आहे. ते थोर क्रांतीकारकांच्या त्याग व बलिदानातून मिळाले आहे.त्या स्वातंत्र्याची फार मोठी किंमत आम्हा भारतीयांना मोजावी लागली असून त्या सर्वांची जाणीव आम्हास आमचा इतिहास करून देत आहे. आमच्या तरुण पिढीच्या जीवनात हा इतिहास कृतीने आल्यास तरुणांच्या जीवनात देशभक्तीची भावना अधिक वाढेल. त्यासाठी शहीद भगतसिंग यांचे स्वाभिमानी व प्रखर देशभक्तीच्या कार्याची गावागावात पारायणे व्हायला हवीत. या प्रसंगी प्रा.डॉ.जतीन मेढे, सरजू तायडे यांनी ही शहीद भगतसिंग यांच्या जीवन व कार्यावर मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संघरत्न सपकाळे यांनी तर आभार दीपक ढगे यांनी मानले.

