जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत चौघांना जलसमाधी
जळगाव : जिल्ह्यात वेगवेळ्या घटनेत चौघांना जलसमाधी मिळाली. धरणगाव, पाचोरा, जामनेर व अमळनेर तालुक्यात या घटना घडल्या.
धरणगाव तालुक्यात पष्टाणे येथील नाल्याच्या पूरात हातपाय धूण्यासाठी गेलेल्या रामभाऊ एकनाथ पाटील (45) हा शेतकरी वाहिल्याने मयत झाल्याची घटना गुरुवार, 19 रोजी दुपारी तीन वाजता घडली. दुसर्या घटनेत पाचोरा येथे हिवरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेला जयेश दत्तात्रय महाजन (22., रा. शिव कॉलनी, पाचोरा) याचा मृतदेह गुरुवारी दुपारी चार वाजता पाचोरा शहराजवळील वीट भट्टी परीसरात खोल पाण्यात आढळला. तिसर्या घटनेत पातोंडा, ता.अमळनेर येथील सुटवा नाल्यात बुडून राहुल रमेश देवरे (धोबी) (26) या तरुणाचा मृत्यू झाला. सोनखेडी येथून चार आणण्यासाठी तो नदी पोहून पार करत असताना ही घटना गुरुवारी दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान घडली. चौथी घटना जामनेर तालुक्यात बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. कांग नदी पात्रात वाहून गेलेल्या अनिल मोतीलाल राजपुत (44, रा. जामनेरपुरा) या प्रौढाचा मृतदेह 19 रोजी दुपारी हिवरखेडे जवळ आढळला.