भुसावळात आदेशापूर्वीच नियमांच्या अंमलबजावणीने आश्चर्य !
नॉन इसेन्शीयलसोबत डेअरी व किराणा दुकाने बंद केल्याने संताप
भुसावळ : लॉकडाऊनची नवीन नियमावली मंगळवार, 20 रोजी रात्री आठ वाजेपासून लागू होणार असलीतरी शहर हद्दीत मात्र मंगळवारी सकाळी उत्तर भागातील सर्व दुकाने बंद करण्यात आल्याने आश्चर्य व संताप व्यक्त करण्यात आला तर दक्षिण भागात मात्र दुकाने सुरूच होती. कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने नवीन नियमांवलीनुसार अत्यावश्यक सेवेत येणारी किराणा, भाजीपाला, डेअरी, मिठाई विक्रेते, बेकरी आदी सर्व दुकाने केवळ सकाळी सात ते 11 या वेळेतच सुरू राहणार आहे. शहरातील उत्तर भागात अर्थात शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पालिका व पोलिस पथकाने मंगळवारी सकाळी 11 वाजेनंतर दुकाने बंद केली. याबाबत दुकानदारांनी पथकाला आदेशाबाबत विचारणा केली मात्र सूचना मिळाल्याने दुकान बंद करावे, असे सांगितल्याने अत्यावश्यक सेवेतील दुकानेही बंद झाली. यामुळे शहरातील उत्तर भागात शुकशुकाट दिसून आला.
शहरातील अर्ध्या भागात दुकाने सुरू
कोरोनाच्या नवीन नियमांवली नुसार अत्यावश्यक सेवेत येणारी किराणा, भाजीपाला व अन्य दुकानेही सकाळी सात ते 11 वाजेदरम्यान राहणार आहेत मात्र शहरातील निम्मे भागात या नियमाची मंगळवारपासूनच अंमलबजावणी सुरू झाली. याबाबत नियम रात्री आठ वाजेपासून लागू होणार आहे. शहरातील दक्षिण भागात मात्र याबाबत कारवाई न झाल्याने किराणा, डेअरी, बेकरी व अन्य अत्यावश्यक सेवेत येणारी दुकाने खुली होती. अर्ध्या भागातील दुकाने सुरू तर उर्वरित बंद यामुळे दुकानदार व व्यापार्यांनी संताव व्यक्त केला. मात्र आता जिल्हाधिकार्यांनीही या संदर्भात आदेश दिल्याने बुधवारपासून शहरातील अत्यावश्यक सेवेत येणारीही सर्व दुकाने सकाळी सात ते 11 या चार तासांच्या वेळेतच सुरू राहणार आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होणार असल्याने शहरातील सर्वच दुकाने बंद राहणार आहे. शहरात पोलिस व पालिका पथकाकडून 11 वाजेनंतर सुरू राहणार्या दुकानांवर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांकडून अत्यावश्यक सेवेतील दुकानांवर कारवाई करण्यात आली नाही तर केवळ नियमबाह्यपणे सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई केली जात असल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले.



