भुसावळात पालिका मुख्याधिकार्यांच्या घरावर दगडफेक करणार्यांचा निषेध
पालिका कर्मचार्यांनी निदर्शने : जिल्हाधिकारी प्रशासनाला निवेदन : दगडफेक करणार्यावर कारवाईची कर्मचार्यांची मागणी
भुसावळ : पालिकेच्या नूतन मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्या निवासस्थानावर दोन दिवसांपूर्वी अज्ञातानी दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने या घटनेचा गुरुवारी भुसावळ पालिकेतील कर्मचार्यांनी निदर्शने करून निषेध केला. नगरपालिका वर्कर्स युनियनतर्फे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले. समाज कंटकांनी मुख्याधिकार्यांच्या निवासस्थानावर केलेल्या दगडफेकीचा निषेध करण्यात आला तसेच दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली.
पालिका आवारात निदर्शने
गुरुवारी सकाळी पालिकेच्या विविध विभागातील कर्मचार्यांनी एकत्र येत पालिकेच्या आवारात जोरदार निदर्शने केली. यावेळी कर्मचार्यांनी दोषी आरोपींचा पोलिस प्रशासनाने शोध घेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. भविष्यात अशा घटना घडल्यास नाईलाजास्तव संघटनेने आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही प्रसंगी देण्यात आला. पालिकेत महिला मुख्याधिकारी आल्याने त्यांना संरक्षण द्यावे तसेच संघटनेला सहकार्य करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
प्रशासनाला दिलेल्या दिलेल्या निवेदनावर राजू खरारे, संजय बाणाईते, दिनेश अहिरे, शांताराम सुरवाडे, प्रमोद मेढे, नितीन लुंगे, एन.बी.पाटील, पी.डी.संसारे, व्ही.व्ही.पाटील, संजय सुरवाडे, भागवत चौधरी, डी.ए.मंदवाडे, किशोर जंगले, राहुल पाटील, चेतन पाटील, आत्माराम दुसाने, विजयसिंग राजपूत, पंकज पन्हाळे, राजेंद्र लांडगे, विनोद शिंदे, मोहन भारंबे, जयकुमार पिंजारी यांच्यासह शेकडो कर्मचार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.