साकेगावनजीक व्यावसायीला लुटले : आरोपी पोलिसांच्या नजरेत
भुसावळ : दुचाकीने शेताकडे निघालेल्या साकेगावच्या व्यापारी तथा शेतकर्याला साकेगाव शिवारात सिनेस्टाईल दुचाकीने आलेल्या 25 ते 30 वयोगटातील दरोडेखोरांनी मारहाण करीत व डोळ्यात मिरची पूड टाकून लुटल्याची घटना सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेत लुटारूंनी 75 हजारांची रोकड व सुमारे पाच तोळे वजनाच्या दोन चैन मिळून सुमारे तीन ते तीन सव्वा लाखांचा ऐवज लांबवला. दरम्यान, तक्रारदार विनोद परदेशी यांनी लुटारूंपैकी एकाला ओळखले होते. पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी दोन पथक तयार केले होते. पोलिस लवकरच या गुन्ह्याची उकल करणार असून यातील तीनही आरोपी पोलिसांच्या नजरेत असल्याचे उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले. जक्रारदार विनोद बजरंग परदेशी (रा.साकेगाव) हे सोमवारी सकाळी 10 वाजता ते दुचाकीने साकेगाव शिवारातील महामार्गालगतच्या शेतात भाजीपाला आणण्यासाठी निघाले असता सिनेस्टाईल दुचाकीने आलेल्या तिघा लुटारूंनी परदेशी यांची दुचाकी अडवत त्यांना मारहाण सुरू केली तसेच त्यांच्या मानेवर काहीतरी धारदार वस्तू लावून त्यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाच्या दोन चैन तसेच खिशातील 75 हजारांची रोकड लांबवून पोबारा केला होत. या गुन्ह्यातील तीन संशयीत हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. लवकरच त्यांना अटक होईल, असे उपअधीक्षक वाघचौरे म्हणाले.




