भुसावळात भरदिवसा घरफोडी : 27 हजार लांबवले
भुसावळ : शहरात चोर्या-घरफोड्यांचे सत्र थांबायला तयार नाही. महेश नगरातील रहिवासी संजय नारायणदास पेशवाणी हे त्यांच्या आईला रेल्वे स्थानकावर सोडण्यास गेले असता त्यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरातील सात हजार रूपये रोख तसेच मोबाईल व एक एलईडी टीव्ही असा सुमारे 27 हजारांचा ऐवज लांबवल्याची घटना गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पेशवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तेली मंगल कार्यालयाबाहेरून दुचाकी लांबवली
दुसर्या घटनेत भुसावळ शहरातील तेली मंगल कार्यालयात राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीला आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी कार्यालयाच्या बाहेर लावलेली दुचाकी (एम.एच.28 ए. 5654) अज्ञात चोरट्याने लांबवली. बुधवारी रात्री सहा ते आठ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.