हातावर पोट भरणार्यांसाठी प्रशासन व दानशूरांनी घ्यावा पुढाकार
लॉकडाऊनमुळे मोडले कंबरले : जीवन झाले असह्य
रावेर : वर्षभरापासून कोरोना संकटाने मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांसह हातावर पोट भरणार्यांना आता कोरोना दुसर्या लाटेत जगणे असह्य झाले आहेत त्यात पुन्हा लॉकडाऊनचे संकट ओढवल्याने हाताला काम मिळेनासे झाल्याने जगावे कसावे? हा यक्ष प्रश्न सार्यांपुढे उभा ठाकला आहे. गतवर्षी स्थानिक प्रशासनाने व्यापार्यांकडून धान्य जमा करून त्याचे किट्स तयार करून गरीब कुटुंबाना वाटप केल्याने या कुटुंबाला जगण्यासाठी मोठा आधार ठरला होता मात्र यंदा परंतु यावर्षी कुठेही गरीब कुटुंबाना किट्स वाटप झाले नाहीत शिवाय दानशूरही पुढे आले नसल्याने त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
लॉकडाऊनमुळे मोडले कंबरले
गतवर्षाप्रमाणे कोरोना व्हायरसचा प्रभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आले होते. अनेकांच्या हाताला काम नसल्याने हातावर पोट असणार्या कुटुंबाचे हाल होऊ नये म्हणून शासनाने व्यापारी विविध संस्थाना मदतीचे अवाहन केले होते व गरीब कुटुंबाना वेग-वेगळे धान्याचे किट्स तयार करून वाटप करण्यात आले होते. यावर्षीदेखील वेगळी स्थिती नाही. तालुका पूर्ण थांबला असतांना गरीब कुटुंबाना पुन्हा मदत करण्याची गरज आहे. प्रशासनाने त्या संदर्भात दखल घेवून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



मोफतचे धान्य अजुन प्राप्त नाही
लॉकडाऊन लागुन सहा दिवस उलटले असून शासनाने एका महिन्याचे मोफत धान्य देण्याचे जाहीर केले होते परंतु अजुन नियतनच प्राप्त नाही त्यात कोरोनात लाभार्थींचा थंब घ्यायचा किंवा नाही यात संभ्रम पसरला आहे. सध्या नियमित धान्य वाटप सुरू आहे. मोफतचे धान्य गोडाऊनमध्ये अद्याप प्राप्त नसल्याचे पुरवठा अधिकारी हर्षल पाटील यांनी सांगितले.
तहसीलकडे सुमारे पाऊणे आठ लाख जमा
रावेर ग्रामीण रग्णालयात ड्यूरो ऑक्सिजन सिलेंडर बसविण्यासाठी तालुक्यातील विविध दानशुरांनी सुमारे पाऊणे आठ लाखांचा निधी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्याकडे जमा केला आहे. यात मागील वर्षीचे 28 हजार शिल्लक असा एकूण 7 लाख 75 हजार 353 रुपये विविध दानशुरांनी दिलेल्या निधीतूनन जमा झाला आहे. यातुन ड्यूरो सिलेंडर उभारण्यात येणार आहे.

