ट्रकच्या धडकेत पित्याचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी
वाघळूद फाट्याजवळ अपघात : मयत जळगावजवळील आव्हाणेचे रहिवासी : वाहन चालक पोलिसांच्या ताब्यात
यावल : भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत पित्याचा मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाल्याची यावल-भुसावळ मार्गावरील वाघळुद फाट्याजवळ बुधवार, 21 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील सुरेश सोनवणे (45, आव्हाणे, ता.जळगाव) हे ठार झाले तर त्यांची कन्या मनीषा सुरेश सोनवणे (19) ही गंभीर जखमी झाली. अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक जप्त करण्यात आला असून चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
आव्हाणेत पसरली शोककळा
आव्हाणे येथील सुरेश सोनवणे तर त्यांची कन्या मनीषा या म्हैसवाडी येथून बोरावलमार्गे भुसावळकडून यावलकडे येत असताना भरधाव ट्रक (जी.जे.27 टी.टी.4378) ने दुचाकीला धडक दिल्याने सुरेश सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची कन्या मनीषा गंभीर जखमी झाली. अंजाळे येथील धनराज शांताराम सपकाळे व सागर निवृती तायडे यांनी घटनास्थळी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मनीषाला तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवले तर प्राथमिक औषधोपचारानंतर पुढील उपचारासाठी जळगावी हलवले.



