भुसावळात रेमडेसीव्हरची ब्लॅकमध्ये विक्री : दोघा आरोपींना तीन दिवसांची कोठडी


भुसावळ : कोरोना रुग्णांसाठी लागणार्‍या रेमडेसीव्हर इंजेक्शनची तब्बल 20 ते 25 हजारात विक्री करणार्‍या दोघांच्या बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीवरून बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास बद्री प्लॉटमधील ओम पॅथालॉजीमधून मुसक्या आवळल्या होत्या. आरोपींना गुरुवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, बुधवारी दोन संशयीतांची चौकशी सुरू असताना गुरुवारी पुन्हा एका संशयीताला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या गुन्ह्यात ओम पॅथालॉजीचे चालक विशाल शरद झोपे (28, बद्री प्लॉट, भुसावळ) व कर्मचारी गोपाळ नारायण इंगळे (18, मानमोडी, ता.बोदवड) यांना अटक केली आहे.

डमी ग्राहक पाठवून केली कारवाई
बद्री प्लॉटमधील ओम पॅथालॉजीमध्ये चढ्या दराने रेमडेसीव्हर इंजेक्शनची मिळत असल्याची तक्रार आल्यानंतर बनावट ग्राहक पाठवून शहानिशा करून कारवाई करण्यात आली होती. आरोपींकडून 19 हजार 600 रुपये किंमतीचे चार इंजेक्शन जप्त करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या चौकशीत दोन संशयीतांची चौकशी सुरू असून एक अन्य संशयीताला गुरुवारीदेखील चौकशीकामी ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.




पोलिसांनी न्यायालयात दिले पत्र
पोलिसांनी संशयीतांकडून जप्त केलेल्या इंजेक्शनचा रुग्णांसाठी वापर व्हावा या संदर्भात न्यायालयात पत्र दिले असल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले. रुग्णांची इंजेक्शनसाठी होत असलेली गैरसोय पाहता माणुसकीच्या भावनेने पोलिसांनी हे पत्र दिले असून न्यायालयाच्या निर्देशाने ते संबंधित यंत्रणेकडे सोपवले जाणार आहे. तपास पोलिस अधीक्षक अर्चित चांडक करीत आहेत. या गुन्ह्यात आणखी मासे अडकण्याची शक्यता आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !