साकेगावजवळ जबरी दरोडा : आरोपी आदर्श तायडेला कोठडी
भुसावळ : दुचाकीने शेताकडे निघालेल्या साकेगाव व्यापारी तथा शेतकरी विनोद बजरंग परदेशी (रा.साकेगाव) यांना लुटण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी 10 वाजता साकेगाव महामार्गाजवळ घडली होती. सिनेस्टाईल आलेल्या आरोपींनी परदेशी यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून 75 हजारांची रोकड व सुमारे पाच तोळे वजनाच्या दोन चैन मिळून सुमारे तीन ते तीन सव्वा लाखांचा ऐवज लांबवला होता. तक्रारदार विनोद परदेशी यांनी लुटारूंपैकी एक संशयीत सोनू पांडे यास ओळखले असलेतरी गुन्ह्यानंतरही तीनही संशयीत पसार झाले होते. त्यातील एक संशयीत मध्यप्रदेशात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने मध्यप्रदेशातील बोरसोल, जि.बर्हाणपूर येथून बुधवारी अटक करण्यात आली. आदर्श उर्फ डफली बाळु तायडे (वय 23, रा. न्यू आंबेडकर नगर भुसावळ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून दुचाकी जप्त करण्यात आली. दरम्यान, आरोपीला गुरुवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता सोमवार, 26 पर्यंत पोलिस कोठडी सुनावणीत आली.




