सीएसआर निधीतून कोविड सुविधा उपलब्ध करा


शिशिर जावळे यांची जिल्हाधिकारी राऊत यांच्याकडे मागणी

भुसावळ : कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यासाठी, रुग्णवाहिका, शववाहिका, उपलब्ध करून देण्यासाठी, विद्युत दाहिनी, ऑक्सीजन प्लांट निर्मितीसाठी, सर्व शासकीय रुग्णालयातील अपुर्‍या आरोग्य सेवांच्या संपूर्ण पूर्ततेसाठी, रेमडिसिवर इंजेक्शनचा मुबलक साठा तसेच मोठ्या प्रमाणात पीपीई किट, उपलब्ध करून देण्यासाठी विविध कंपन्यांनी सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रीस्पॉन्सिबिलिटी) फंडातून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

देय निधीचे योग्य वितरण व्हावे
जावळे यांच्या निवेदनानुसार, जळगाव जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी, सर्व औद्योगिक कंपन्यांनी, सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी, आयआरसीटीसी रेल्वे, दीपनगर, पॉवर प्लांट, भुसावळ, ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ, वरणगाव, दीपनगर पॉवर प्लांट मधील कार्यान्वित असलेल्या सब वेंडॉर्शिप घेतलेल्या सर्व कंपन्यांनी सामाजिक कार्यासाठी देय असलेला सीएसआर फंडातून वरील कामे करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. विविध सेवा जनहितार्थ उपलब्ध करून द्याव्यात व या संकट काळी स्वतः पुढे येऊन सरसावून पुढाकार घ्यावा यासाठी या सर्वांकडून सक्तीचा सीएसआरफंड जिल्हाधिकार्‍यांनी घ्यावा व या विविध आरोग्यविषयक समस्या सोडवाव्यात.. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व साई निर्मल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिशिर जावळे यांनी केली आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !