दातृत्वाचे कोठार : ट्रामा केअर सेंटरला पुरवले ऑक्सीजन सिलिंडर
भुसावळ : कोरोनाच्या गत वर्षभरापासूनच्या काळापासून अडल्या-नडलेल्यांना सढळ हाताने मदत करून सामाजिक सेवेचा वसा नेहमीच जोपासणार्या भुसावळातील नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारींनी कोरोनाच्या लाटेत दुसर्या वर्षीही आपल्या दातृत्वाचे कोठार खुलेच ठेवले आहे. भुसावळातील ग्रामीण रुग्णालय डीसीसीएचमध्ये ऑक्सीजनचा वापर वाढला असता असतानाच दोन दिवसांपूर्वी ऑक्सीजन पुरवठ्याअभावी रुग्णांचाजिव टांगणीला आला असताना नगरसेवक निर्मल कोठारी यांनी दहा ऑक्सीजन सिलेंडर देवून रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हँण्डग्लोजची केली मदत
ट्रामा व ग्रामीण रुग्णालयासाठी नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी यांनी दोन हजार हँडग्लोजची मदत दिली शिवाय ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांच्या कार्याचे शहरातून कौतुक होत आहे. नगरसेवक कोठारी यांनी दिलेल्या मदतीच्या हातामुळे रुग्णांना दिलासा मिळाला असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयुर चौधरी, डॉ. विक्रांत सोनार यांनी सांगितले.
कोठारींच्या दातृत्वाची सर्वदूर चर्चा
एक उत्तम नगरसेवक कसा असावा ? याचा आदर्श कोठारींच्या रुपाने समाजापुढे आला आहे. वॉर्डातील नागरीकांच्या गरजा सोडवण्यासह कोरोनाच्या कठीण काळात गरजूंना अन्य-धान्याचे वाटप तसेच लॉकडाऊनमुळे पायीच गावाकडे निघालेल्या परप्रांतीयांना जेवणासह वाहनाची व्यवस्था करून कोठारींच्या सामाजिक कार्याची प्रचिती आली होती. अलिकडच्या काळात कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठीदेखील झटताना कोठारी दिसल्याने त्यांच्या कार्य कर्तृत्वाला मनापासून सलाम ! परमेश्वर त्यांना जनसेवेच्या कामासाठी उदंड आयुष्य देवो, याच या निमित्ताने सदिच्छा !


