भुसावळात लॉकडाऊनचे उल्लंघण : 98 जणांवर कारवाई
नाकाबंदीदरम्यान आढळला एक बाधीत : 232 वाहनधारकांवरही कारवाई
भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका आणि पोलिस प्रशासनाने शहरात संचारबंदीचे उल्लंघण करणार्यांवर दररोज धडक कारवाई सुरू केली आहे. दररोज विना मास्क लावणार्यांवर कारवाई केली जात आहे शिवाय गुरुवारी अचानक विविध भागात अचानक बाहेर फिरणार्यांची तसेच रेल्वे स्थानकावरील मुसाफिर खान्यातील प्रवाशांची अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आली. त्यात 156 जणांची तपासणी केल्यानंतर त्यात एक बाधीत आढळल्याने त्यास उपचारार्थ हलवण्यात आले. दरम्यान, प्रशासनाने केवळ सकाळी सात ते 11 दरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांना दुकाने उघडण्याची मुभा दिली असलीतरी अन्य व्यावसायीकही आपापले दुकाने उघडत असल्याने अशा दुकानदारासह मास्क न लावणाऱ्या तसेच विनाकारण बाहेर फिरून कोरोना स्प्रेड वाढवणाऱ्या तब्बल 98 जणांवर कारवाई करीत दंड वसूल करण्यात आल्याने त्यांच्यात खळबळ उडाली.
रेल्वे स्थानकावरही तपासणी
पोलिस व पालिका प्रशासनाच्या पथकाने गुरुवारी सकाळी भुसावळ रेल्वे स्थानकावरील मुसाफिर खान्यात बसलेल्या प्रवाशांचीदेखील अचानक अॅन्टीजन तपासणी केल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. कोरोनाचा स्प्रेड रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात असल्याने नागरीक व प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले.



उपअधीक्षक व मुख्याधिकारी रस्त्यावर
कोरोना रोखण्यासाठी भुसावळात पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच मुख्याधिकारी संदीच चिद्रवार गुरुवारी रस्त्यावर उतरले. याप्रसंगी त्यांनी वाहनधारकांना विनाकारण बाहेर न फिरण्याचे आवाहन केले तसेच नियम मोडणार्यांविरुद्ध कारवाई करणार असल्याचे बजावले. काहीही कारण नसताना फिरणार्या नागरीकांना प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे दंड केला जात असल्याने त्यांनी घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले.
वाहनधारकही आता रडारवर
गाडी चालवताना परवाना सोबत नसणे, गाडीचे कागदपत्रे नसणे, तीन शीट चालवणे आदी कारणांवरून गुरुवारी 232 केसेस करण्यात येवून दंड करण्यात आला. भुसावळकर नागरीकांसह वाहनधारकांनी संचारबंदीचे उल्लंघण करू नये तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे, असे इशारा डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिला.

