भुसावळ रेल्वेने केला मास्क न लावणार्यांकडून 50 हजारांचा दंड वसुल
भुसावळ विभागात रेल्वेच्या कारवाईने खळबळ ः रेल्वे गाड्यांमध्येही कारवाईची अपेक्षा ः सिटींग डब्यातील सोशल डिस्टन्सचे काय ? रेल्वे गाड्यांमध्ये धडक दंडात्मक कारवाईची अपेक्षा
भुसावळ : कोरोनाचा स्प्रेड सर्वत्र वाढत असताना रेल्वे स्थानकासह मुसाफीर खाना व रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांकडून नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. राज्य शासनाला याबाबत कारवाईचे अधिकार असल्याने रेल्वेकडून मात्र केवळ जनजागृतीवर भर दिला जात असल्याने प्रवाशांचे फावले होते मात्र 17 रोजी रेल्वे बोर्डाने रेल्वे प्रशासनाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर मास्क न लावणार्यांवर कारवाई केली जात आहे. भुसावळ विभागात गेल्या आठ दिवसांच्या काळात 311 प्रवाशांकडून 49 हजार 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आरक्षीत गाड्यांमध्ये सोशल डिस्टन्स असलेतरी सिटींग डब्यात मात्र एकाच सीटावर चौघे प्रवास करीत असल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत असल्याचे चित्र आहे.
अशी झाली कारवाई
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ दिवसात 311 प्रवाशांकडून 49 हजार 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. त्यात 18 एप्रिल 17 प्रवाशांकडून तीन हजार 300, 19 रोजी 48 प्रवाशांकडून आठ हजार 500, 20 रोजी 41 प्रवाशांकडून सहा हजार 700, 21 एप्रिल रोजी 40 प्रवाशांकडून सहा हजार 600, 22 रोजी 40 प्रवाशांकडून चार हजार 900, 23 रोजी 35 प्रवाशांकडून जणांकडून चार 900 रुपये, 24 रोजी 45 प्रवाशांकडून आठ हजार तर 25 रोजी 45 प्रवाशांकडून सहा हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. एका प्रवाशाकडून सुमारे पाचशे रुपयांप्रमाणे दंड वसुल केला जात आहे.



सोशल डिस्टन्सचा फज्जा
भुसावळ रेल्वे स्थानकावरून शेकडो प्रवासी प्रवास करीत असलेतरी गाड्यांमध्ये नियमांना हरताळ पाळली जात असल्याचे चित्र आहे तर सिटींग डब्यात तर एकाच बर्थवर चार प्रवाशांना प्रवासाची मुभा असल्याने सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडताना दिसून येतो. शिवाय प्रवासी मास्क विनाच प्रवास करीत असल्याचेही निदर्शनास येते. अशा प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने तिकीट निरीक्षकांनी अचानक (फुकट्या प्रवाशांवर होणार्या कारवाईप्रमाणे) मोहिम राबवल्यास निश्चित कोरोना स्प्रेड रोखता येईल, असा सूर सर्वसामान्य नागरीकांमधून उमटत होत आहे.
फुकट्या प्रवाशांसह विक्रेत्यांचे काय ?
आरक्षीत गाड्यात जादा दराने प्रवासी आरक्षीत तिकीट काढून प्रवास करीत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर विविध गाड्यांमध्ये अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेते व फुकटे प्रवासी प्रवास करीत आहेत. मुळातच स्थानकात आरक्षीत तिकीटाशिवाय प्रवाशाला प्रवेश नाही त्यामुळे हे मेहरबानी नेमकी कुणाच्या आशीर्वादाने ? यातील दोषींवर रेल्वे प्रशासन कारवाईची हिंमत दाखवणार का? असादेखील प्रश्न आहे.
तर तीव्र आंदोलन : प्रा.धीरज पाटील
महागडे आरक्षीत तिकीट काढून प्रवासी प्रवास करतात मात्र रेल्वे डब्यांमध्ये फुकट्या प्रवाशांसह अनधिकृत विक्रेत्यांची मुजोरी वाढली असतानाही रेल्वे प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात कारवाई होताना दिसत नाही. शिवाय सिटींग डब्यांमध्ये एकाच बर्थवर चार-चार प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा असल्याने सोशल डिस्टन्स कसे राखले जाईल? हा खरा प्रश्न आहे शिवाय विभाग मास्क न लावणार्या प्रवाशांवर कारवाई नगण्य असल्याने कारवाईचा जोर वाढवणे गरजेचे आहे. राज्यातही प्रशासनाने रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी अनिवार्य केल्यास कोरोना स्प्रेड रोखता येईल, असे शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील म्हणाले. मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडू, असेही प्रा.पाटील म्हणाले.

