फैजपूरात दोन हजार किलो प्लास्टीक जप्त


पालिकेची धडक कारवाईने व्यापार्‍यांमध्ये उडाली खळबळ

फैजपूर- पालिकेने प्लास्टिक बंदीसाठी नियुक्त केलेल्या पथकाने गुरुवारी सायंकाळी धडक कारवाई करत शहरातील विजय जनरल स्टोअर्स या दुकानातून लाखो रुपये किंमतीचे दोन हजार किलो प्लास्टिकचा साठा जप्त केल्याने शहरातील व्यापारी वर्गात खळबळ उडाली. शासनाने प्लास्टिक बंदी साठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती व उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर फैजपूर शहर प्लास्टिक मुक्त करण्याससाठी पालिके तर्फे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका कर निरक्षक बाजीराव नवले व पाणीपुरवठा अभियंता विपुल साळूखे या पथकाने मुख्याधिकार्‍यांच्या उपस्थितीत शहरातील मारोती रोडवरील विजय जनरल स्टोअर्स या दुकानावर गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान अचानक छापा टाकला.

दोन हजार किलोचा साठा जप्त
या कारवाईत पथकाने दुकानाच्या तळघरात असलेला लाखो रुपयांचा कॅरीबॅग यासह शासनाने बंदी घातलेल्या अन्य प्लास्टिक वस्तूंचा सुमारे दोन हजार किलोचा साठा पथकाने जप्त केला. या कारवाईमुळे शहरातील व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली. शहरातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे यावेळी कारवाईत तब्बल एक ट्रॅक्टर भरून सर्व प्लस्टिकचा मुद्देमाल पालिकेत आणून पंचनामा करण्यात आला. पालिकेचे कर्मचारी अमोल पाटील, उल्हास चौधरी, बाळू भालेराव, प्रदीप पाराधे, शरद चौधरी, नरेंद्र बाविस्कर, विलास सपकाळे, सुनील कोळी, सुनील ननंदाने, पिटु हस्कर, किशोर वडर, रामा भिरुड, मनोहर चौधरी यासह आरोग्य व सफाई कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली.

प्लास्टिकचा वापर टाळावा -मुख्याधिकारी
शासनाने प्लास्टिक बंदी केल्यावरही शहरातील अनेक व्यावसायिक प्लास्टिकचा सर्रास वापर करत असल्याने आजची मोठी कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या कारवाईत सातत्य राहणार असून नागरीकांनी व व्यावसायिकांनी प्लस्टिकचा वापर टाळून प्रशासनास व निसर्गास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले आहे.


कॉपी करू नका.