पोलिसांच्या दिमतीला व्यापार्यांची सोबत : ‘रात्र गस्तीने चोर्यांना बसणार आळा’
भुसावळात पोलिस उपअधीक्षकांची ‘व्यापारी पोलिस मित्र’ ही संकल्पना : पुढील टप्प्यात सर्व शहरात अंमलबजावणी
भुसावळ : लॉकडाऊनमुळे शहरात केवळ अत्यावश्यक दुकाने शासनाच्या निर्देशानुसार सुरू असून अन्य दुकाने (नॉन इसेन्शीयल) मात्र 14 एप्रिलच्या रात्रीपासून बंद असल्याने ही संधी चोरट्यांच्या पथ्थ्यावर पडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच आठवडे बाजारात मंदिराची दानपेटी फोडण्यासह व्यापार्यांची दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर व्यापार्यांमध्ये धास्ती पसरली. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी व्यापार्यांची बैठक घेत त्यांना आश्वस्त केले शिवाय दुकाने बंद असल्याने व्यापारी घरीच असल्याने वाघचौरे यांनी ‘व्यापारी पोलिस मित्र’ ही संकल्पना दोन दिवसांपूर्वी व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत मांडताच व्यापार्यांनी सकारात्मकता दर्शवली. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांच्या सोबतीला व्यापारी असल्याने अप्रिय प्रकार थांबले आहेत.
…तर चोर्यांना आळा
कोरोनाच्या बंदोबस्तामुळे पोलिस कर्मचारी कर्तव्यावर आहेत शिवाय घटना-घडामोडी, गुन्ह्यांचा तपास, साप्ताहिक सुटी, रजा, आजारपण यासह विविध कारणांमुळे पोलिस कर्मचार्यांचा अभाव असल्याने शहरातील सर्वच भागात गस्त घालण्यास अडचण निर्माण होते मात्र आता व्यापार्यांनी पोलिसांना सोबत दिल्यानंतर संभाव्य चोरीच्या घटना रोखण्यासाठी मदत झाल्याचा विश्वास उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी व्यक्त केला.



दोन दिवसांपासून व्यापारीही गस्तीला
पहिल्या दिवशी विशाल वाधवानी, सनी वाधवानी, राहुल दोदानी. अजय नागराणी, प्रकाश चांदवानी, केशव गेलानी आदी व्यापार्यांनी तर दुसर्या दिवशी नारायण ठरवाणी, रोहित नागदेव, अजय नागराणी, उमेश हसराणी, दीपक तलरेजा, राकेश ठरवाणी, रोशन चावराई, मनीष सोना, नरेश मोहनानी यांनी गस्त घातली. व्यापारी मित्रांच्या दोन टीम करून त्यांना मुख्य बाजारपेठेमध्ये पोलिस अंमलदार सोबत देऊन पायी गस्त देण्यात आली. व्यापार्यांनीदेखील जवाबदारी नेटाने पार पाडली. सहा.निरीक्षक अनिल मोरे यांनी गस्तदरम्यान भेटी देऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. दररोज सहा.निरीक्षक कृष्णा भोये व अनिल मोरे, गणेश धुमाळ, हरीश भोये हे पोलीस अधिकारी दररोज या व्यापारी पोलीस मित्रांना रात्रगस्त दरम्यान भेट देऊन त्यांना आवश्यक त्या सूचना देणार आहेत शिवाय यापुढेही दररोज ‘व्यापारी पोलिस मित्र’ ही संकल्पना भुसावळ शहरांमध्ये राबविण्यात येईल, असेही पोलिस उपअधीक्षक वाघचौरे म्हणाले.

