भुसावळात जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी


खडका रोड परीसरातील 17 हजार कुटूंबांवर पाणीटंचाईचे संकट

भुसावळ- राष्ट्रीय महामार्गावरील पुजा कॉम्प्लेक्सजवळ नाहाटा चौफुलीपासून खडकारोडवरील गौसियानगर, ग्रीन पार्क, गांधीनगर आदी भागांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी शुक्रवारी फुटल्याने हजारो लिटर शुध्द पाण्याची नासाडी झाली. 12 दिवसानंतर शुक्रवारी या भागाला होणारा पाणीपुरवठा थांबल्याने नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील खडकारोड भागात रोटेशननुसार 9 सप्टेंबररोजी पाणीपुरवठा झाला तर 15 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा करण्यापूर्वीच 14 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास शहरातील जलशुध्दीकरण केंद्रातील 500 केव्हीएचा ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाला. ट्रान्सफार्मर दुरुस्तीनंतर रोटेशननुसार शुक्रवारी सकाळी या भागाला पाणीपुरवठा होण्यापूर्वीच पुजा कॉम्पलेक्ससमोर महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाजवळ पाईप लाईनला भगदाड पडून हजारो लिटर शुध्द पाण्याची नासाडी झाली. परीणामी खडकारोडचा विस्तारीत भाग, ग्रीनपार्क, गांधीनगर, गौसिया नग आदी भागांना पाणी मिळाले नाही. पाणी वाया जात असल्याने नाहाटा चौफुलीवरुन पाणीपुरवठा बंद झाला. दरम्यान दुरस्तीसाठी पालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्राने नियोजन केले असलेतरी 17 हजार कुटूंबांवर पाणीटंचाईचे संकट पुन्हा उभे ठाकले आहे.


कॉपी करू नका.