भुसावळातील अनेक नगरसेवकांसह अधिकारी जाणार कारागृहात
भुसावळात माजी आमदार संतोष चौधरींची पुन्हा फटकेबाजी : पालिकेत अमृत, गटार, शौचालयासह एलईडी लाईट खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप
भुसावळ : अण्णाभाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले महामंडळ व मुद्रा लोणमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला असून बोगस कर्ज प्रकरणे तयार करण्यात आली असून गरीबांचे स्वस्त धान्य हडपून आता खदानीतही सर्रास गौण खनिजाची चोरी चालवण्यात आली असल्याचे टोला कुणाचेही नाव न घेता माजी आमदार संतोष चौधरींनी येथे लगावला. ते म्हणाले की, अमृत योजनेसह गटार, शौचालयासह एलईडी लाईट खरेदीतही घोटाळा झाला असून यातील दोषी नगरसेवकांसह अधिकार्यांना कारागृहात टाकल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही, असा सूचकही इशाराही त्यांनी येथे दिला. तेली मंगल कार्यालयात गुरुवारी रात्री शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळावा झाला. प्रसंगी ते बोलत होते.
भुसावळ पालिकेतही घरकुल घोटाळा
जळगाव महापालिकेप्रमाणे भुसावळ नगरपालिकेतही घरकुल घोटाळा झाला असून या बाबीला जवाबदार असणार्या काही नगरसेवकांसह अधिकार्यांना तुरूंगवारी घडवल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही, असा इशारा चौधरींनी दिला. ते म्हणाले की, मी राजकारणात सक्रिय नसल्याचे काहींनी मत बनवले मात्र मी शांत बसलेला नव्हतो तर सभोवताली जे घडत आहे त्याचे ऑडीट करता होतो व आता माझा नगरपालिकेचा परीपूर्ण अभ्यास झाला असून सत्ताधार्यांनी काय-काय घोटाळे केले त्याचे पुरावे आपल्याजवळ आहेत. पालिकेत गटार, लाईट, अमृत ईतकेच नव्हे तर शौचालय बांधकामाही घोटाळा करण्यात आल्याने जळगाव महानगरपालिकेप्रमाणे येथेही घरकुल घोटाळा झाला असून आगामी काळात अनेक नगरसेवक व अधिकार्यांना तुरूंगवारी घडवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
गौण खनिजाची खुलेआम चोरी
बोगस कामांच्या माध्यमातून कोट्यवधींची माया जमवण्यात आली आहे शिवाय गोर-गरीबांच्या हक्काचे रेशन खाल्ले कुणी ? हे जनतेला माहित आहे. गौण खनिजाची सर्रास चोरी सुरू असून दोषींच्या मालमत्तेवर बोजे बसवून आपण या सर्वांना तुरुंगात पाठविल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही माजी आमदार चौधरी म्हणाले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, जिल्हा प्रवक्ता योगेश देसले, उमेश नेमाडे, राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश घुले, नितीन धांडे, राजेंद्र चौधरी, उल्हास पगारे, ममता सोनवणे, सचिन पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.