आचारसंहिेतेमुळे रखडली 20 कोटींची विकासात्मक कामे


शहरातील खडतर रस्त्यांच्या कामालाही महिनाभर ब्रेक

भुसावळ : शहरात पालिकेने 12 कोटी रुपयांतून डांबरीकरणाच्या रस्त्यांसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रशासकिय मंजूरीचा प्रस्ताव पाठवला होता, तर आमदार निधीतूनही तब्बल आठ कोटी रुपयांचा विकास कामांना प्रशासकिय मंजूरी मिळाली होती, मात्र आता विधानसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने या कामांना ब्रेक लागला आहे. शहरातील सर्वांत बिकट प्रश्न बनलेल्या खड्डेमय रस्त्यांचाही प्रश्न आचारसंहिता संपल्यानंतर मार्गी लागणार आहे.

आचारसंहितेमुळे होणार नाहीत आता कामे नाहीत
भुसावळ शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी 12 कोटी रुपयांच्या विशेष रस्ता निधी मंजूरीचा ठराव पालिकेने विशेष सभेत केला होता. या ठरावाला मंजूरीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आला होता, या कामासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून प्रशासकीय मंजुरीनंतर तत्काळ निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार होती मात्र आता या मंजूरीपूर्वीच विधानसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागल्याने जिल्हाधिकार्‍यांची प्रशासकिय मंजूरी मिळाली तरी पालिकेला पूढील निविदा प्रक्रिया राबवता येणार नाही. यामुळे शहरातील सर्वांत जटील प्रश्न असलेल्या रस्त्यांच्या कामाला पून्हा महिन्याभराचा विलंब होणार आहे. शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर खड्ड्यांची समस्या कायम आहे. तर अंतर्गत भागातही अमृत येाजनेच्या पाईप लाईन खोदकामामुळे रस्त्यांची स्थिती बिकट झाली आहे. आता आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर आता नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यातच शहरातील रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना गती येईल. दरम्यान आमदार संजय सावकारे यांच्या आमदार निधीतील व 12/ 15 ची तब्बल आठ कोटी रुपयांची विकासकामांना प्रशासकिय मंजूरी मिळाली आहे, या कामांची आता लवकरच ई निविदा प्रसिध्द केली जाणार होती, मात्र आदर्श आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया पूर्ण होणार नाही. निवडणूकीनंतरच या कामांनाही मुहूर्त गवसणार आहे. यात प्रामुख्याने ग्रामिण भागातील गटारी, स्मशानभुमी उभारणी, ढापे, रस्ते, पेव्हर ब्लॉक बसविणे आदींची कामे आता थांबवणार आहेत.

6 कोटींच्या कामांना वर्कऑर्डर
आदर्श आचारसंहिता लागण्यापूर्वीच पालिकेच्या माध्यमातून होणार्‍या तब्बल 6 कोटी रुपयांच्या विकासकामांना गेल्या दोन दिवसांपूर्वीच वर्क ऑर्डर देण्यात आली. शहरातील विविध भागांमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे, ओपन स्पेसचा विकास करुन उद्यान व प्ले ग्राऊंड निर्मिती, संरक्षण भिंत, नवीन गटारी, ढापे आदी कामांचा यात समावेश आहे. वर्क ऑर्डर मिळाल्याने आदर्श आचारसंहितेत देखील हे कामे करता येतील, मात्र भुमीपूजन व लोकार्पण किंवा कोणत्या राजकिय पक्षाचा प्रचार होईल, असा फलक कामांजवळ लावता येणार नाही.


कॉपी करू नका.