मेहुणबारेच्या लाचखोर हवालदारासह पंटर एसीबीच्या जाळ्यात
पोलिस ठाण्यातच स्वीकारली लाच : पोलिस दलात प्रचंड खळबळ
मेहुणबारे : हाणामारीच्या गुन्ह्यात तक्रारदाराला मदत करण्यासह वाढीव 354 कलम न लावण्यासाठी 15 हजारांची लाच मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या हवालदाराला चांगलीच महागात पडली. खाजगी पंटरासह हवालदाराच्या जळगाव एसीबीच्या पथकाने लाच घेताना सोमवारी दुपारी मुसक्या आवळल्या.हवालदार शालिकराम व्यंकटराव कुंभार (टाकळी प्रचा, खरजाई) व खाजगी पंटर बाळासाहेब भाऊसाहेब देशमुख (चाळीसगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे आरोपींनी मेहुणबारे पोलिस ठाण्यात लाच स्वीकारली.
पोलिस ठाण्यात स्वीकारली लाच
मालेगाव तालुक्यातील 40 वर्षीय तक्रारदाराविरुद्ध मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात सहकार्य करण्यासह वाढीव कलम न लावण्यासाठी आरोपी हवालदाराने 21 रोजी लाच मागितली. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर 23 रोजी मेहुणबारे पोलिस ठाण्यात आरोपीने पंटराकडे लाच देण्याचा इशारा केल्यानंतर आधी पंटर व नंतर हवालदारास अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक जी.एम.ठाकुर, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, प्रशांत ठाकुर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली.