ईव्हीएममधील छेडछाडमुळेच भाजपाला निवडणुकीत यश
माजी आमदार शिरीष चौधरी : अदानी-अंबानींच्या फायद्यासाठीच कलम 370 केले रद्द
रावेर- नोटबंदी, बेरोजगारीमुळे सर्वसामान्य तर जीएसटीमुळे व्यापारी व पाण्यासह शेतमालाला योग्य भाव नसताना शेतकरी त्रस्त झाले असून दुसरीकडे मात्र ईव्हीएममध्ये छेडछाड करून भाजपावाले विजय मिळवत असल्याचा आरोप माजी आमदार शिरीष चौधरी यांनी येथे केला. जम्मू-काश्मिरातील कलम 370 हटवण्यामागे अदानी-अंबांनींना जमिनी विकत घेण्याची मुभा उपलब्ध करून देण्यात आली शिवाय देशात भावनिक वातावरण निर्माण करून निवडणुकीच्या तोंडावर जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही टोला माजी आमदार चौधरींनी लगावला. राष्ट्रवादीतर्फे 10 ऑगस्टपासून काढण्यात येणार्या जनसंवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते.
फेकुंच्या जुमल्यात न अडकण्याचे आवाहन
माजी आमदार चौधरी यांनी भाजपावर प्रहार करताना या सरकारमुळे 20 कंपन्यांना कुलूप ठोकण्याची वेळ आल्याचे सांगत रेपो दर सातव्या स्थानावर पोहोचल्याने या फेकू सरकारच्या जुमल्यात न अडकता काँग्रेस-राष्ट्रवादीला सरकारला साथ देण्याचे आवाहन केले. रावेर-यावल विधासभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादीतर्फे 10 तारखेपासून जनसंवाद यात्रा काढण्यात येणार असाहे. या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी माजी सैनिक सभागृहात बैठक झाली
यांची होती उपस्थिती
या बैठकीला जिल्हा परीषद सदस्या सुरेखा पाटील, ग.स.सदस्य तुकाराम बोरोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नीळकंठ चौधरी, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, प्रतिभा बोरोले, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, माजी सभापती डॉ.राजेंद्र पाटील, जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, गयासुद्दीन काझी, राजेंद्र चौधरी उर्फ राजू ठेकेदार, भागवत विश्वनाथ पाटील, अर्जुन जाधव, जगदीश घेटे, गुलाब तडवी, जिजाबराव चौधरी, गोंडू महाजन, गयास शेख, किशोर पाटील, राजेंद्र चौधरी, अॅड.योगेश गजरे, यादवराव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नाथाभाऊनंतर आता चंद्रकांत दादांचा नंबर
भाजपा पक्षात असलेले बहुजन समाजाचे मुखवटे भाजपावाले आता संपवायला निघाले आहेत. माजी मंत्री नाथाभाऊ यांच्यानंतर आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा नंबर असल्याचा दावा करीत आपण भाजपात जाण्याची चर्चा निव्वळ असून मी काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता असून काँग्रेसमध्ये राहूनच निवडणूक लढवण्यात असल्याचा खुलासा माजी आमदार चौधरी यांनी करीत भाजपा प्रवेशाच्या उठलेल्या वावड्यांना विराम दिला.