पाचशे रुपयांची लाच भोवली : चाळीसगावातील लघू पाटबंधारे विभागाचा चौकीदार जाळ्यात
चाळीसगाव : शेत जमीन लाभ क्षेत्रात येत नसल्याबाबत ना हरकत दाखला लघू पाटबंधारे बांधकाम, उपविभाग पाचोरा उपविभागीय अधिकारी यांच्याकडून तयार करून देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच मागणार्या लघू पाटबंधारे विभागातील चौकीदार सुरेश बेनीराम वाणी (54, रा.दगडी बिल्डिंग, तिसरा मजला नारायण वाडी, चाळीसगाव) यास धुळे एसीबीच्या पथकाने कार्यालयाच्या आवारातच लाच स्वीकारताच अटक केली. शुक्रवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास हा सापळा यशस्वी करण्यात आला. या कारवाईनंतर लघू पाटबंधारे विभागात मोठी खळबळ उडाली.
धुळ्याच्या पथकाचा चाळीसगावात सापळा यशस्वी
58 वर्षीय तक्रारदार यांची मौजे चाळीसगाव येथील शेत जमीन लाभ क्षेत्रात येत नसल्याबाबत ना हरकत दाखला मिळवून देण्याच्या मोबदल्यात आरोपी चौकीदार सुरेश वाणी यांनी 28 मे रोजी पाचशे रुपये लाचेची मागणी केली मात्र तक्रारदार यांना लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली व त्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपीने शुक्रवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध चाळीसगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक एसीबीचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलिस उपअधीक्षक विजय जाधव (रीडर) यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, राजन कदम, कैलास जोहरे, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, चालक सुधीर मोरे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

