भुसावळातून भाजपाची उमेदवारी संजय सावकारेंनाच मिळणार !


कार्यकर्त्यांना विश्‍वास : ग्रामीण भागात प्रचाराच्या झंझावाताला सुरुवात

भुसावळ (अमोल देवरे) : भाजपा-शिवसेना युतीचे घोडे अडले असतानाच भुसावळात भाजपाकडून विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्यासह सहा जणांनी उमेदवारी मागितली असून इच्छुकांनी जनसंपर्कदेखील वाढवला आहे. भुसावळात भाजपातर्फे उमेदवारी कुणाला मिळणार? याबाबत विविध मतांतरे असलीतरी निष्ठावान कार्यकर्त्यांना मात्र विद्यमान आमदार संजय सावकारे यांनाच उमेदवारी मिळेल, असा आत्मविश्‍वास आहे. दुसरीकडे आमदार संजय सावकारेदेखील उमेदवारीबाबत निर्धास्त असून प्रसिद्धी माध्यमांना त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया न देता ग्रामीण भागात प्रचाराला सुरुवात केली आहे.

आमदार तिसर्‍यांदा निवडणुकीला जाणार सामोरे
2009 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार संजय सावकारे यांनी नंतरच्या काळात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून भाजपात प्रवेश केला व 2014 च्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले. सलग दोनवेळा आमदार राहिलेले सावकारे हे पुन्हा तिसर्‍यांदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. निवडणुकीत कुणाचा जय-पराजय होईल हे काळ ठरवणार असलातरी सावकारे विजयी झाल्यास ही त्यांच्यासाठी तिसर्‍यांदा हॅट्रीक ठरेल, असेही कार्यकर्त्यांना वाटते.

भुसावळ तालुक्यात भाजपाचा वरचष्मा
भुसावळ पालिकेवर माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वात भाजपाने एकहाती सत्ता मिळवली असून पंचायत समितीतही भाजपाचे वर्चस्व आहे. तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपाचे वर्चस्व आहे. तालुक्यातील वरणगाव पालिकेवरही भाजपाचे वर्चस्व असल्याने भाजपा उमेदवारासाठी या जमेच्या बाजू आहेत. जिल्हा परीषदेच्या दोन पैकी एका जागेवर भाजपा उमेदवार विजयी झाले आहेत. या सर्व सकारात्मक बाबींचा विचार केल्यास आमदार सावकारे यांना उमेदवारी पक्षाकडून मिळेल, असे त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना वाटते.

निष्ठावंतांनाच मिळणार संधी -युवराज लोणारी
विद्यमान आमदार सावकारे यांनाच भाजपातर्फे तिकीट मिळेल यात शंका नाही. जे भाजपाचे सदस्य नाहीत, ज्यांची विचारसरणी भाजपाची नाही, अशा कोणत्याही व्यक्तीला उमेदवारी मिळणार नाही, असा ठाम विश्‍वास नगरसेवक युवराज लोणारी यांनी व्यक्त केला. सर्व कार्यकर्ते आमदारांसोबत असून ‘आम्हालाच भाजपाची उमेदवारी मिळणार’, अशी अफवा उडवणार्‍यांना जनता थारा देणार नाही, असे लोणारी यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’च्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.


कॉपी करू नका.