अंतुर्ली फाटा पोलीस चौकी अखेर मध्यप्रदेश हद्दीत


खासदार रक्षा खडसेंची बर्‍हाणपूर जिल्हाधिकार्‍यांशी सकारात्मक चर्चा

मुक्ताईनगर : कोरोना बंदोबस्तामुळे मध्यप्रदेश शासनाने लावलेल्या पोलीस नाक्यावर मुक्ताईनगर येथील रुग्णालयातून घरी जात असतांना अंतुर्ली येथील सहा दिवसांच्या नवजात बाळासह सिझर शस्त्रक्रिया झालेल्या महिलेला दवाखान्याची कागदपत्र दाखवल्यावर सुद्धा मध्यप्रदेश पोलिसांनी थांबवून गाडीच्या खाली उतरवून त्रास दिल्याने संतप्त भावना व्यक्त होत्या. मुक्ताईनगर येथून अंतुर्ली परिसरात जाण्यासाठी ईच्छापूर मार्गे राष्ट्रीय महामार्ग हा मुख्य रस्ता असून मध्यप्रदेश पोलिसांनी लावलेल्या नाक्यामुळे परीसरातील नागरिकांना व शेतकर्‍यांना मोठा त्रास होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर खासदार रक्षा खडसेंकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. खासदार अंतुर्ली येथे द्वारदर्शनासाठी जात असतांना त्यांना हा प्रकार लक्षात आला असता त्यांनी तत्काळ बर्‍हाणपूर जिल्हाधिकारी प्रवीण सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत ही बाब निदर्शनास आणून दिली तसेच नाीीकांना होणार्‍या त्रासाबद्दल माहिती देऊन तत्काळ सदर पोलीस चौकी मध्यप्रदेश हद्दीत हलविण्याबाबत चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी दखल घेत चौकी हलवण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.

तपासणी नाक्यामुळे वाढला मनस्ताप
मागील वर्षी सुद्धा पोलीस चौकीमुळे अंतुर्ली येथील नागरीकास जीव गमवावा लागला होता. तेव्हा संतप्त नागरीकांनी आंदोलन करून तत्काळ पोलीस नाका हटविण्यासाठी आंदोलन केल्यानंतर खासदार रक्षा खडसेंनी प्रत्यक्ष आंदोलना ठिकाणी जाऊन जिल्हाधिकारी बर्‍हाणपूर (मध्यप्रदेश) यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्र राज्य सीमेत असलेला नाका शाहपूर रस्त्यावरील शिरसोदा फाट्यावर हलविण्यासंदर्भात महत्वाची भूमिका बजावली होती. आता पुन्हा तपासणी नाक्यामुळे परीसरातील ये-जा करणार्‍या समस्त नागरिक, शेतकरी व वाहन धारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते त्यामुळे खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने सदर नाका मध्यप्रदेश हद्दीत हलविण्यात आला असून त्यामुळे या परीसरातील नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !