वृद्धाला मारहाण भोवली : हवालदाराचे निलंबन
सांगली : वृद्धाला मारहाण केल्याप्रकरणी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सदानंद मारूती वाघमोडे यांना निलंबीत करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली. जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षीत गेडाम यांनी शुक्रवारी याबाबतचा आदेश काढले. करंजे येथील भगतमळा येथे वास्तव्यास असलेले पोपट माने व त्यांची पत्नी यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले. याची माहिती पोलीस हवालदार वाघमोडे यांना मिळाल्यानंतर यांनी सोमवारी रात्री 10 वाजता माने यांना करंजे येथून खानापूर पोलीस औट पोस्ट ठाण्यात आणले. त्यावेळी त्यांनी वृध्दाला काठीने पाठीवर, पायावर व मांडीवर जबर मारहाण करून त्यांना जखमी केले. या प्रकरणाची जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षीत गेडाम यांनी गंभीर दखल घेत हवालदार सदानंद वाघमोडे यांच्यावर शुक्रवारी निलंबनाची कारवाई केली.



