शिवसेना भवनासमोरच भाजपा-सेना कार्यकर्ते भिडले
मुंबई : राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपाला लक्ष्य केल्यानंतर वाद चिघळला असतानाच दादरच्या शिवसेना भवनासमोरच भाजपा आणि सेनेचे कार्यकर्ते भिडल्याने तणाव वाढला. राम मंदिर जमीन खरेदी व्यवहारावरून झालेल्या आरोपावरून भाजपा युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. शिवसेना भवनाकडे निघालेल्या भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले व त्याचवेळी शिवसेना भवनासमोर आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली.
या कारणासाठी भाजपाने काढला मोर्चा
अयोध्येत शिवसेनेने राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाने शिवसेना भवनावर मोर्चा काढला. मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना म्हणाले की, सत्तेत राहण्यासाठी आणि खुर्ची कायम ठेवण्यासाठी शिवसेना सोनिया सेना बनून काँग्रेसच्या इशार्यावर पूर्णपणे नाचत आहे. आपल्या क्षुल्लक राजकारणासाठी आमच्या धर्मावर आणि आस्थेवरील आक्रमण थांबवा, असं तिवाना म्हणाले. या प्रकरणाची पूर्ण चौकशी करावी, चौकशीनंतर सत्य बाहेर येईल असं विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी जबाबदारी विसरु नये. पोलिसांनी योग्य चौकशी करुन कारवाई करावी, असे दरेकर म्हणाले.



