नियम न पाळल्यास व गर्दी वाढल्यास तिसर्‍या लाटेला आमंत्रण


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : टास्क फोर्स, वरीष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक

मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिल्या. या संदर्भात टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरीष्ठ अधिकारी यांच्या समवेतच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी राज्यभर सिरो सर्व्हेक्षण करणे, मोठ्या प्रमाणावर लसीकरण पूर्ण करणे यावर भर देताना निर्बंधांचे पालन काटेकोरपणे होणे गरजेचे आहे असे सांगितले. गर्दी वाढली आणि आरोग्याचे नियम पाळले गेले नाहीत तर दुसर्‍या लाटेतून सावरता सावरता आपण महिन्या दोन महिन्यात तिसर्‍या लाटेलाही सामोरे जाऊ, अशी भीती व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जर्‍हाड, प्रधान सचिव वित्त राजगोपाल देवरा, प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदिप व्यास, डॉ रामास्वामी, डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित, डॉ तात्याराव लहाने यांची उपस्थिती होती.

दुसर्‍या लाटेने बरेच काही शिकवले
मुख्यमंत्री म्हणाले की, पहिल्या लाटेच्या वेळेस आपल्याकडे सुविधांची कमी होती, त्यात आपण वाढ करीत गेलो, दुसर्‍या लाटेने देखील आपल्याला बरेच काही शिकविले. ही लाट ओसरत असून त्यातील अनुभवातून आपल्याला आवश्यक ती औषधी, आरोग्य सुविधा, बेड्स , ऑक्सिजन उपलब्धता या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावे लागेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की ऑगस्ट- सप्टेंबर पासून देशाला 42 कोटी लसी मिळताहेत अशी माहिती मिळते आहे त्यामुळे लसीकरण वेगाने सुरु होऊन महाराष्ट्रालाही त्याचा फायदा होईल. लसीकरण हा या लढाईत महत्वाचा भाग असला तरी आरोग्य विषयक नियमांचे पालन करणे, मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे हे अत्यावश्यक आहे. या बैठकीत पुढच्या काळात लागणारी संभाव्य औषधे, त्यांची खरेदी , त्यासाठी लागणार्‍या निधीची तरतूद, आरटीपीसीआर कीट, मास्क, पीपीई किट्स अशा बाबींवर विस्तृत चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांनी सर्व सबंधित यंत्रणांनी समन्वयाने हे उपलब्ध राहील असेही सांगितले.

तिसर्‍या लाटेत रुग्ण संख्या वाढू शकते
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसर्‍या लाटेत अतिशय कमी कालवधीत रुग्ण संख्या दुप्पट झाली. नव्या डेल्टा प्लस व्हेरीयंटचाही धोका असल्याने तिसरी लाट आल्यास राज्यात रुग्ण संख्या परत दुपट्टीने वाढू शकते. पहिल्या लाटेत 19 लाख रुग्ण होते, दुसर्‍या लाटेत ही संख्या 40 लाखापेक्षा जास्त झाली होती. सक्रीय रुग्णांची संख्याही 8 लाख होऊ शकते तसेच 10 टक्यांच्या आसपास संसर्गग्रस्त मुलांची संख्या असू शकते, असे आरोग्य विभागाने सादरीकरणात सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !