कजगावच्या लाचखोर तलाठ्याला चार वर्ष शिक्षा


जळगाव : शेतकर्‍यांचया पाच मुलांमध्ये कागदोपत्री वाटे-हिस्से करण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी भडगाव तालुक्यातील कजगावचे तत्कालीन तलाठी धनराज भावराव मोरे यांना जिल्हा न्यायालयाने चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. कजगाव येथील शेतकरी हिरालाल फकिरा महाजन (माळी) यांच्या नावे कजगाव शिरवारात (गट.410/क्षेत्र 2.16 आर) अशी वडीलोपार्जित शेत जमीन आहे. ही शेत जमीन 4 भावंडासह मयत वारसदाराच्या पत्नी अशा पाच जणांमध्ये समसमान वाटणी करायची होती. त्यासाठी हिरालाल महाजन यांनी तलाठी कार्यालयात जावुन माहिती घेत त्यासाठी तलाठी धनराज मोरे यांची भेट घेतली. वाटणी करण्यासाठी तलाठी मोरे याने महाजन यांच्याकडे 6 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत हिरालाल महाजन यांचा मुलगा भानुदास याने लाचलूचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.

आरोपी तलाठ्यास शिक्षा व दंडही
तक्रारीनुसार जळगाव येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठी कार्यालयात सापळा रचून 23 मार्च रोजी दुपारी तलाठी धनराज भावराव मोरे यास तक्रारदाराकडून सहा हजार रुपयाची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. तपासाधिकारी निता कायटे यांनी दोषारोपपत्र दाखल केल्यावर जिल्हा न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरु होते. प्राप्त पुरावे, दस्तऐवज साक्षीदारांच्या साक्ष याच्या आधारे सशंयीत तलाठी धनराज भावराव मोरे याच्या विरुद्ध दोषारोप सिद्ध होवुन न्या. पी.वाय लाडेकर यांच्या न्यायालयाने बुधवारी शिक्षेची सुनावणी केली. यात आरोपी तलाठी धनराज मोरे याला लाचेची मागणी (कलम-7) केल्या प्रकरणी 3 वर्षे सक्त मजुरी 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास साधी कैद, सरकारीपंचा समक्ष लाच स्वीकारल्या (कलम-13) प्रकरणी चार वर्षे सक्त मजुरी 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास साधी कैदेची शिक्षा ठोठावली आहे. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. मोहन देशपांडे यांनी कामकाज पाहिले.


कॉपी करू नका.