भुसावळातील शिवीगाळ प्रकरण : मुख्याधिकार्यांसह पाच जणांचे नोंदवले जवाब
भुसावळ : अतिक्रमण झालेल्या जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना माजी आमदार संतोष चौधरी यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची घटना सोमवार, 14 जून रोजी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात चौधरींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी शुक्रवार, 18 रोजी बाजारपेठ पोलिसांनी न्यायालयात सीआरपीसी 164 नुसार मुख्याधिकार्यांसह पाच जणांचे जवाब नोंदवले असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
चौधरींचा शोध : पोलिसांनी नोंदवले जवाब
सोमवारी शहरातील सर्वोदय छात्रालयाच्या जागेवर करण्यात आलेल्या बेकायदा बांधकामाची पाहणी करण्यासाठी मुख्याधिकारी गेल्यानंतर त्यांना माजी आमदार चौधरींनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणी शुक्रवारी बाजारपेठ पोलिसांनी मुख्याधिकारी संदीप चिद्रवाद, रचनाकार भटू पवार, सहाय्यक नगररचनाकार शुभम आडकर, कर निर्धारण अधिकारी व प्रशासकीय अधिकारी रामदास मस्के, वसुली लिपीक अनिल भाकरे यांचे सीआरपीसी 164 नुसार न्यायालयात जवाब नोंदवले. दरम्यान, गुन्ह्यातील संशयीत आरोपी चौधरी हे पसार असून त्यांचा पोलिसांच्या विविध पथकांतर्फे कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

