संतोष चौधरी म्हणाले, खोट्या गुन्ह्यांना भीक घालत नाही ; मुख्याधिकार्‍यांना ओळखतही नाही


न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा : बाजारपेठ पोलीस ठाण्यात नोंदवला जवाब

भुसावळ : अतिक्रमण झालेल्या जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना माजी आमदार संतोष चौधरी यांनी शिवीगाळ केल्याची घटना सोमवार, 14 रोजी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी चौधरी यांच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. चौधरी यांना या गुन्ह्यात मंगळवारपर्यंत अटक करू नये व पोलिसांना तपासात सहकार्य करावे या अटीवर अंतरीम जामीन मंजूर झाल्यानंतर रविवारी चौधरींनी पोलीस ठाण्यात हजेरी लावत आपला जवाब नोंदवला. याप्रसंगी वकील अ‍ॅड.जगदीश जगदीश कापडे, कृउबा सभापती सचिन चौधरी, सतीश घुले, आशिक खान शेरखान आदींची उपस्थिती होती.

हे देखील वाचा : भुसावळ पालिका मुख्याधिकारी माजी आमदारांकडून शिवीगाळ

राजकीय आकसापोटी गुन्हा : मुख्याधिकार्‍यांना ओळखत नाही
पोलीस ठाण्यात जवाब नोंदवल्यानंतर चौधरी हे बाहेर पडत असताना माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. प्रसंगी चौधरी म्हणाले की, मुख्याधिकार्‍यांना आपण ओळखत नाही, पाहिलेले देखील नाही, राजकीय आकस व दबावपोटी आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हा आपल्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून खोट्या गुन्ह्यांना आपण भीक घालत नाही, असेही ते म्हणाले.

मदत मागितल्याने त्या ठिकाणी गेलो
‘त्या’ जागेवर काहींनी बेकायदा कब्जा करून वॉचमन यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला व त्यावेळी वॉचमन यांनी आपल्याला मदतीसाठी बोलावल्याने त्यांच्या मदतीसाठी आपण तेथे गेलो व कुणाला मदत करणे म्हणजे कायद्याने गुन्हा नाही, असे चौधरी यांनी सांगितले.

भुसावळातील अतिक्रमणाविरोधात आता लढा
भुसावळात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले असून काहींनी या माध्यमातून महिन्याला लाखोंची वसुली सुरू केली आहे. या संदर्भात नगरविकास मंत्र्यांना भेटून अतिक्रमण हटवण्यासंदर्भात मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : भुसावळातील शिवीगाळ प्रकरण : मुख्याधिकार्‍यांसह पाच जणांचे नोंदवले जवाब 

जिल्हा अधीक्षकांकडून पोलीस संरक्षण घेणार
चौधरी म्हणाले की, आगामी काळात पालिकेच्या निवडणुका असून आपल्याविरोधात राजकीय षडयंत्राद्वारे खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेवून शासनाची रीतसर फी भरू पोलीस संरक्षण मागणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. शासनाचा कर्मचारी सोबत असला म्हणून खोट्या गुन्ह्यांना आळा बसेल, असेही त्यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !