जागतिक हृदय दिनानिमित्त भुसावळात 29 रोजी जनजागृती रॅली
भुसावळ : भुसावळ स्पोर्टस् अॅण्ड रनर्स असोसिएशन व आयएमए, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिनानिमित्त जनजागृती रॅली रविवार, 29 सप्टेंबर रोजी सकाळी 6.45 वाजता जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. जनजागृती रॅलीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी.एस ग्राउंड ) येथून सुरुवात होऊन जामनेर रोडवरील नवशक्ती ऑर्किड व तेथून वळसा घेऊन पुन्हा रॅलीच्या नियोजित ठिकाणी परत येणार आहे. तीन किलोमीटर अंतराच्या या रॅलीमध्ये शहरातील डॉक्टर्स, रेल्वे व पोलीस कर्मचारी, शिक्षक व विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होतील, अशी माहिती कार्यक्रमाच्या समन्वयिका डॉ.नीलिमा नेहेते यांनी दिली.
जनजागृतीसाठी रॅली
29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. अनियमित जीवनशैली, ताणतणाव, चिंता, आहारातील बदल इत्यादी प्रमुख कारणांमुळे दिवसेंदिवस हृदयविकाराचे प्रमाण वाढले असून यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या हृदयाची काळजी घ्यावी व निरोगी जीवन जगून देश घडवण्याच्या कार्यात सहभागी व्हावे, हा संदेश भुसावळकर नागरीकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशन, भुसावळ शाखेच्या संयुक्त विद्यमाने विशेष जनजागृती रॅली काढली जात आहे. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या हस्ते व भुसावळ रेल्वे स्टेशन संचालक जी.आर.अय्यर यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीला सुरुवात होईल. या रॅलीत नागरीकांनी सहभाग नोंदवून योगदान द्यावे, असे आवाहन भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.प्रवीण फालक व आय.एम.ए.भुसावळ शाखेचे अध्यक्ष डॉ.दिनेश फिरके यांनी केले आहे.