धरणगाव अँग्लो उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना मारहाण

सहा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा : संस्थेच्या नावाने बनवली बनावट कागदपत्रे व शिक्के
धरणगाव : शहरातील अँग्लो उर्दु हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये शिरून सभा घेण्याच्या नावाखाली मुख्याध्यापकांनाच शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी 8.45 वाजता घडली. दरम्यान, आरोपींनी या संस्थेच्या नावाची बनावट कागदपत्रे व शिक्के बनवल्याचा आरोप मुख्याध्यापकांनी तक्रारीत केला असून गुन्हा घडल्यानंतर आरोपी पसार झाले.
सहा आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा
धरणगाव अँग्लो उर्दु हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक शेख शकीलोद्दीन जमीलोद्दीन यांच्या तक्रारीनुसार बुधवारी सकाळी पावणेनऊ वाजता संशयीत आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शाळेत घुसून सभा घेण्याच्या निमित्ताने प्रवेश करीत शाळेत वर्ग सुरू असताना मुख्याध्यापकांना धुक्काबुक्की करून कामात अडथळा आणला तसेच शिवीगाळ केली. आरोपींनी यापूर्वी वेळोवेळी संस्थेच्या नावाने बनावट कागदपत्र व शिक्के तयार केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयीत आरोपी सगीर खाटीक, मो.नईम काझी , मेहबूब पठाण, अब्दुल अझीझ, शेख इब्राहीम, हाजी रसूल यांच्याविरुद्ध धरणगाव पोलिसात भादंवि 143, 147, 149, 352, 448, 504, 506, 417, 465, 468, 471 व महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37 (1) (2)चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पसार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे. तपास धरणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
