सायबर गुन्हे टाळण्यासाठी प्रवाशांनी दक्षता घ्यावी


लोहमार्गचे निरीक्षक दिलीप गढरी ; जनजागृतीपर पत्रकांचे वाटप

भुसावळ- संगणक, स्मार्टफोन या सारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून होणारे संभाव्य सायबर गुन्हे टाळण्यासाठी प्रवाशांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन भुसावळ लोहमार्गचे निरीक्षक दिलीप गढरी यांनी केले. महाराष्ट्र सायबरच्यावतीने जनजागृतीपर पत्रके वाटून प्रवाश्याची जागृती करण्याचे काम केले जात असून या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. गढरी पुढे म्हणाले की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या ई- मेलवर क्लिक करू नका, ई मेल पासवर्ड ऑटो सेव्ह करणे टाळा, ब्राऊजर अद्यावत करा, संगणकावरील इस्टॉल प्रोग्रॉमकडे वेळोवेळी लक्ष ठेवा, अ‍ॅन्टी व्हायरसचा उपयोग करा, संगणकासाठी वैयक्तीक फायबर वॉल अद्ययावत करून घ्यावा, मोबाईल स्मार्टफोनला पासवर्ड ठेवा, बँकेविषयीची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करू नका, अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रीक्वेस्ट स्विकारू नका, अनोळखी व्यक्तीच्या लिंक्स उघडू नका, एचटीपीएसने सुरुवात होणार्‍या सुरक्षित संकेतस्थळाचाच वापर करा, बँकेविषयीची कोणतीच माहिती कोणालाही दुरध्वनी व मोबाईलवर देऊ नका, एटीएम कार्डचा वापर करताना एटीएम सेंटरची पाहणी करून संशयास्पद आढळल्यास पुढील व्यवहार करणे टाळा, सायबर गुन्हा घडला असल्यास सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही निरीक्षक दिलीप गढरी यांनी यावेळी केले. या प्रसंगी पोलिस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी निरीक्षक दिलीप गढरी व रेल्वे पोलीस कर्मचार्‍यांनी रेल्वे स्थानकातील मुसाफीर खान्यात सायबर गुन्हे रोखण्याबाबत प्रवाशांना जनजागृती पत्रके वाटून प्रचार व प्रसार करण्यात आला.


कॉपी करू नका.