धुळ्यातील खून प्रकरण : आरोपी तरुणाची कोठडीत रवानगी
धुळे : भाड्यासाठी तगादा लावणार्या घर मालकाचा भाडेकरू तरुणाने लोखंडी पावडी व रॉड डोक्यात टाकून खून केल्याची घटना चितोड रोडवरील राजहंस कॉलनीत मंगळवारी सकाळी घडली होती. या प्रकरणी अटकेतील तरुणाला बुधवारी धुळे न्यायालयात हजर केले असता 25 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
घर मालकाचा खून : पत्नी बचावली
धुळ्यातील राजहंस कॉलनीतील रहिवासी रमेश हिलाल श्रीराव (60, प्लॉट नं.4, आशीर्वाद बंगला) यांचा त्यांच्याच घरात राहणारा तरुण भाडेकरू अजिंक्य मेमाणेने मंगळवारी पहाटेच्या सुमारास डोक्यात लोखंडी पावडी टाकून खून केला होता. याचवेळी श्रीराव यांच्या पत्नी प्रमिला यांचा गळा आवळून तसेच जेवणाचा काटेरी चमचा त्यांच्या गळ्यात रूतवत त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नही करण्यात आला मात्र त्यांनी सुटका करीत मदतीसाठी आरडा-ओरड केल्याने नागरीक जमल्याने अनर्थ टळला होता. आरोपी तरुणास मंगळवारी अटक करण्यात आल्यानंतर बुधवारी धुळे न्यायालयात हजर केले असता त्यास 25 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली पावडी, काटेरी चमचा व पाईप जप्त केल्याचे तपासाधिकारी तथा धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख म्हणाले.


