20 हजारांची लाच भोवली : मूर्तिजापूरचा उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
अकोला : मूर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक मारोती सोळंके यांना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी 20 हजारांची लाच घेताना अटक केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली. सलग दोन दिवसांत एकाच पोलीस ठाण्यातील एक अधिकारी आणि एक कर्मचारी लाचखोरीत अडकल्याने लाचखोरीविषयी चर्चा रंगली आहे.
कारवाई न करण्यासाठी मागितली लाच
मूर्तिजापूर येथील सिरसो परिसरातील रहिवासी एका 43 वर्षीय तक्रारदारावर दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक न करण्यासाठी त्याचवेळी सोडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके याने 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यासोबतच पकडलेली नवीन दुचाकी जप्त न करता जुनी दुचाकी जप्तीमध्ये दाखविली. या मोबदल्यात एकूण 20 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात अली परंतु तक्रारदारावर काही संशय आल्याने लाच रक्कम स्वीकारली नाही; मात्र या प्रकरणाची पडताळणी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 20 ऑगस्ट रोजी केली. या पडताळणीत आरोपी पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके हा दोषी आढळल्याने लाचखोर पोलीस उपनिरीक्षकास गुरुवारी रामदासपेठ पोलीस ठाण्यातून अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी केली.
दोन दिवसांत दोन ट्रॅप
लाचखोर पोलीस अधिकारी व कर्मचाजयावर दोन दिवसांत दोन ट्रॅप झाल्याने मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यातील लाचखोरी प्रचंड वाढल्याचे वास्तव आहे. पहिल्याच दिवशी एका कर्मचाजयास लाच घेताना अटक केल्यानंतर दुसजयाच दिवशी त्याच पोलीस ठाण्यातील एक अधिकारी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करताना पडताळणीत दोषी आढळतो. यावरून लाचखोर पोलिसांनी गेंड्याची कातडी पांघरल्याचे दिसून येत आहे.