वाघाडी फॅक्टरीत केमिकल स्फोट : संचालकांसह डेप्युटी, जनरल मॅनेजरला अटक
शिरपूर- तालुक्यातील वाघाडी येथील रुमित केमिसिंथ कंपनीत गत महिन्यातील 31 ऑगस्ट रोजी सकाळी झालेल्या भीषण स्फोट प्रकरणी शिरपूर पोलिसांनी शुक्रवारी केमिकल कंपनीच्या एका संचालकासह डेप्युटी मॅनेजर व जनरल मॅनेजर यांना अटक केली असून न्यायालयाने आरोपींना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, अटकेतील आरोपींमध्ये कंपनीचे संचालक संजय बापूराव वाघ (नाशिक), डेप्युटी मॅनेजर नायट्रेशन ब्लॉक गणेश भानुदास वाघ (अमळनेर) व जनरल मॅनेजर अनिल केशव महाजन (गुलई, ता.खकणार, शिरपूर) यांचा समावेश आहे. कंपनीत झालेल्या स्फोटप्रकरणी कंपनी व्यवस्थापनाविरोधात शिरपूर शहर पोलिस ठाण्यात कर्मचारी गब्बरसिंग पावरा (शिरपूर) यांच्या फिर्यादीनुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे.