भुसावळकरांवर पुन्हा ओढवले जलसंकट : इलेक्ट्रीक मोटर्समध्ये बिघाड


भुसावळ : भुसावळकरांवरील जलसंकट कमी व्हायला तयार नाही. एक-ना अनेक कारणांमुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने भर पावसाळ्यात शहरवासीयांवर भटकंतीची वेळ आल्याने संताप व्यक्त होत आहे. पालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रातील 500 केव्हीचा ट्रान्सफार्मरमध्ये सलग दोनवेळा बिघाड झाल्यानंतर पालिकेने भाडे तत्वावरील ट्रान्सफार्मर लावला मात्र शनिवारी सकाळी 170 व 120 अश्वशक्तीच्या इलेक्ट्रीक मोटर्स जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाली. गत पंधरवड्यांपासून बिघाडांचे सत्र सुरू झाल्याने शहरवासीयांची भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती होत आहे. 14 सप्टेंबर रोजी झालेल्या ट्रान्सफार्मर बिघाडाच्या वेळीही या दोन्ही मोटारी बंद झाल्या होत्या. त्यावेळी पालिकेने या दोन्ही मोटारींची दुरुस्ती युध्दपातळीवर केली होती. आता ही यंत्रणा कार्यान्वित केल्यास पुन्हा मोटारी जळणे किंवा ट्रान्सफार्मर फेल होण्याचा धोका वाढला आहे. यामुळे यंत्रणा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दरम्यान, जामनेररोडवरील पूर्व व पश्चिमेकडील दोन्ही भाग, खडकारोड, जळगावरोड, तापीनगर, शांतीनगर, वांजोळारोड आदी भागांना गेल्या दोन आठवड्यांपासून पाणीपुरवठा झाला नाही.


कॉपी करू नका.