भुसावळात निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारणार्‍या 17 दांडी बहाद्दरांना नोटीस


भुसावळात निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाणे यांनी निवडणूक कर्मचार्‍यांना दिले प्रशिक्षण

भुसावळ- मतदानाच्या दिवशी 21 ऑक्टोंबर रोजी पहाटे सहा वाजता प्रत्येक मतदान केंद्रावर मॉक ड्रील करावे व त्यानंतर सात वाजेच्या आत मतदान मशीन (ईव्हीएम) मतदानासाठी तयार ठेवावे तसेच कुठलीही अडचण आल्यास तत्काळ आपल्या वरीष्ठांना त्याची माहिती द्यावी, प्रत्येक कर्मचार्‍यांना मशीन ऑपरेट कसे करावे याचे ज्ञान असायला हवे त्यामुळे प्रत्येकाने क्लासरूम प्रशिक्षण व ईव्हीएम प्रात्यक्षिकाचा बारकाईने अभ्यास करावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी रामसिंग सूलाणे यांनी येथे केले.
शनिवारी येथील पांडुरंग टॉकीजमध्ये विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक कर्मचार्‍यांसाठी प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या दिवसाच्या प्रशिक्षण वर्गाला 17 कर्मचार्‍यांनी दांडी मारल्याने 17 कर्मचार्‍यांना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 24 तासांच्या आत खुलासा करण्याचे आदेशही देण्यात आले.

दोन टप्यात प्रशिक्षण
निवडणुकीसाठी नियुक्त आठशे कर्मचार्‍यांना शनिवारी व रविवारी प्रशिक्षण दिले जात आहे. शनिवारी पांडुरंग टॉकीजमध्ये प्रांताधिकारी तसेच सहायक अधिकारी तथा तहसीलदार दीपक धिवरे, निवडणूक नायब तहसीलदार सतीश निकम, योगेश मुस्कावाड यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयात कर्मचार्‍यांनी ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक केले यावेळी निवडणुकीशी संबंधीत माहिती पुस्तिका देण्यात आली. शनिवारी सकाळी 9 ते 12 या वेळात पांडुरंग टॉकीजमध्ये कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी 227 मतदान केंद्राध्यक्षांना बोलाववण्यात आले मात्र 10 जणांनी दांडी मारली तर प्रथम मतदान अधिकारी 274 बोलाविले होते त्यापैकी सात कर्मचार्‍यांनी दांडी मारली.


कॉपी करू नका.