पैठण तहसीलदारासह वकील औरंगाबाद एसीबीच्या जाळ्यात
लाच भोवली : कूळ जमीन प्रकरणात मदतीसाठी मागितली लाच
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या तहसीलदाराला आणि एका वकिलाला व खाजगी पंटराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रविवारी एक लाखांचे लाच घेतल्यानंतर अटक केल्याने राज्यात खळबळ उडाली. कूळ जमीन प्रकरणामध्ये मदत करण्यासाठी 30 लाख रुपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती एक लाख रुपयांची लाच स्वीकारण्यता आल्याची माहिती आहे. महेश सावंत असे लाच घेणार्या तहसीलदाराचे नाव आहे. अॅन्टी करप्शनने ताब्यात घेण्यात आलेल्या वकिलाचे नाव अद्याप समजलेले नाही. याप्रकरणी तक्रारदाराने औरंगाबादच्या अॅन्टी करप्शन विभागाकडे त्यांची तक्रार केली होती. तक्रारदाराचे कुळ जमिनीचे काम तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे होते. सावंत यांनी तक्रारदारास मदत करण्यासाठी 30 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख रुपये देण्याचे ठरले. पैठण तहसीलदार महेश नारायण सावंत तसेच खाजगी वकील कैलास सोपान लिपणे पाटील व खाजगी पंटर बद्रीनाथ कडूबा भवर अशी आरोपींची नावे आहेत.